भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकचा, वेस्ट इंडिजविरुद्ध टी-२० सामन्यासाठी World XI संघात समावेश करण्यात आलेला आहे. ३१ मे रोजी लॉर्ड्सच्या मैदानावर हा सामना रंगणार आहे. दोन भारतीय खेळाडूंच्या समावेशामुळे भारतीय चाहते या सामन्याला मोठ्या प्रमाणात हजेरी लावतील असा विश्वास आसीसीसीने व्यक्त केला आहे.
काही महिन्यांपूर्वी कॅरेबियन बेटांवर आलेल्या वादळामुळे या परिसरात मोठं नुकसान झालं होतं. येथील मदतकार्यात हातभार लावण्यासाठी आयसीसीने या विशेष टी-२० सामन्याचं आयोजन केलं आहे. लॉर्ड्सच्या मैदानावर पाकिस्तानविरुद्ध सामन्यात हार्दिक पांड्याने ४३ चेंडूत ७६ धावांची खेळी अजुनही क्रिकेट प्रेमींच्या स्मरणात आहे. याचसोबत दिनेश कार्तिकनेही श्रीलंकेत पार पडलेल्या निदहास चषकाच्या अंतिम फेरीत बांगलादेशविरुद्ध सामन्यात शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत भारताला विजय मिळवून दिला होता. या धडाकेबाज कामगिरीच्या आधारावर कार्तिक आणि पांड्याची World XI संघात निवड झालेली असल्याचं आयसीसीने स्पष्ट केलं आहे.
कॅरेबियन बेटांवर आलेल्या वादळामुळे अनेक गोष्टींचं नुकसान झालेलं आहे. अँटीगा येथील सर व्हिव रिचर्ड मैदानाचीही दुर्दशा झालेली आहे. त्यामुळे या सामन्यातून मिळणारा निधी हा कॅरेबियन बेटांवर हाती घेण्यात आलेल्या कामांसाठी दिला जाणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध World XI संघाचं नेतृत्व इयॉन मार्गन करणार असून या संघात पाकिस्तानचे शाहिद आफ्रिदी-शोएब मलिक, बांगलादेशचे शाकिब अल हसन-तमिम इक्बाल, थिसारा परेरा (श्रीलंका), राशिद खान (अफगाणिस्तान) यांनी आपला सहभाग निश्चीत केला आहे.