Hardik Pandya Likely To Miss IPL 2024: भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला २०२३ च्या विश्वचषकादरम्यान घोट्याला दुखापत झाली होती आणि अखेरीस स्पर्धेतून तो बाहेर पडला होता. विश्वचषकाच्या नंतर लगेचच मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पांढऱ्या चेंडूंची मालिका आणि डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेतील मोहिमेला सुद्धा पंड्याला मुकावे लागले. जानेवारीच्या सुरुवातीला अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या T20I मालिकेसाठी तो तंदुरुस्त होईल अशी अपेक्षा असताना, पीटीआयमधील एका अहवालात असे सुचवण्यात आले आहे की अद्याप पंड्याच्या प्रकृतीत हवा तसा बदल दिसून आलेला नाही, ज्यामुळे पंड्याला अफगाणिस्तानची मालिका तर सोडावी लागूच शकते पण बहुचर्चित ‘मुंबई इंडियन्सच्या कर्णधार पदावर’ असूनही खेळण्याची संधी गमवावी लागू शकते.
११ ते १७ जानेवारी दरम्यान तीन सामन्यांच्या T20I मालिकेत भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामना होणार आहे. जूनमध्ये विश्वचषकापूर्वी हे T20I भारतासाठी आपली क्षमता तपासून पाहण्याची शेवटची संधी असणार आहे. जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 सामन्यात क्षेत्ररक्षण करताना घोट्याला दुखापत झाल्याने सूर्यकुमार यादव मालिकेला मुकणार असल्याचे वृत्त यापूर्वी आले होते. सूर्यकुमारला सुद्धा बरे होण्यासाठी सहा आठवडे लागू शकतात असे समजत आहे.
पीटीआयने पुढे सांगितले की, हार्दिकही घोट्याच्या दुखापतीतून बरा होण्याची शक्यता कमी आहे आणि त्यामुळे तो अफगाणिस्तान मालिकेलाच मुकणार नाही तर आयपीएल २०२४ च्या सीझनमधूनही बाहेर पडू शकतो. बीसीसीआयच्या एका सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, “आतापर्यंत हार्दिकच्या फिटनेस स्थितीबद्दल कोणतेही अपडेट नाही आणि आयपीएल संपण्यापूर्वी त्याच्या उपलब्ध असण्याबद्दल सुद्धा एक मोठे प्रश्नचिन्ह आहे.”
टीम इंडिया आणि मुंबई इंडियन्स दोघांसाठी हा मोठा धक्का असू शकतो. राष्ट्रीय संघासाठी, निवडकर्त्यांना अफगाणिस्तानविरुद्ध संघाचे नेतृत्व करण्यासाठी रोहित शर्माने पुनरागमन गरजेचे वाटू शकते. मात्र जर रोहित शर्माने त्याच्या विश्रांतीचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला तर, दक्षिण आफ्रिकेच्या T20I मालिकेदरम्यान सूर्यकुमारचा उपकर्णधार असणारा रवींद्र जडेजा हा कर्णधार पदाचा पर्याय असू शकतो. जडेजा इंग्लंडविरुद्ध पाचही कसोटी सामने खेळणार आहे त्यामुळे त्याला सुद्धा ही संधी मिळाल्यास अतिताण येऊ शकतो. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या रुतुराज गायकवाडच्याही बोटाला दुखापत झाल्याने तो सुद्धा मालिकेतून दूर असणार आहे.
दरम्यान, हार्दिक पंड्याच्या दुखापतीचा सर्वात मोठा परिणाम झाल्यास त्याच्या मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावर होणार आहे.अलीकडेच आयपीएल २०२४ च्या लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या ऐवजी हार्दिक पंड्याची कर्णधार म्हणून घोषणा केली. १५ कोटींचे मानधन व कर्णधारपदाची अट घालून पंड्याने संघात वापसी केल्याची सुद्धा चर्चा आहे. मुंबई इंडियन्स व रोहित शर्माचे चाहते या पदबदलामुळे नाराज असताना हार्दिकच्या दुखापतीचा हा अपडेट अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.