हार्दिक पंडय़ाने गुपित उलगडले
ऑस्ट्रेलिया-विरुद्धच्या मालिकेत दणकेबाज षटकारांनी हार्दिक पंडय़ाने क्रिकेटजगताचे लक्ष वेधून घेतले आहे. मात्र हे कौशल्य एका रात्रीत विकसित झालेले नाही, तर बालपणापासून मला षटकार खेचण्याचा छंद जडला होता. त्यामुळेच आता मी शास्त्रशुद्धपणे षटकार मारतो, असे पंडय़ाने सांगितले.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध चालू असलेल्या मालिकेत पंडय़ाने दुसऱ्यांदा आपल्या वादळी फटकेबाजीची नजाकत पेश करून भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. चेन्नईत झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात पंडय़ाने लेग-स्पिनर अॅडम झम्पाच्या गोलंदाजीवर हल्ला चढवताना षटकार खेचले होते. त्यानंतर रविवारी इंदूरला झालेल्या तिसऱ्या सामन्यात पंडय़ाने डावखुरा फिरकी गोलंदाज अॅश्टॉन अगरच्या गोलंदाजीवर षटकारांची आतषबाजी केली.
चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पध्रेत पाकिस्तानविरुद्ध साकारलेली ७६ धावांची खेळी कारकीर्दीला कलाटणी देणारी ठरली का, या प्रश्नाला उत्तर देताना पंडय़ा म्हणाला, ‘‘तुम्ही जर तसा विचार करीत असाल, तर माझी काहीच हरकत नाही. त्याआधी आयपीएल स्पध्रेत मी माझ्या अष्टपैलूत्वाची चुणूक दाखवली आहे. मागील वर्षी आयपीएल स्पध्रेत माझी कामगिरी चांगली झाली नव्हती, मात्र मी माझ्या खेळावर मेहनत घेऊन यंदा उत्तम कामगिरी बजावली.’’
‘‘मी बालपणापासून गेली अनेक वष्रे षटकार खेचत आलो आहे. आता फक्त आंतरराष्ट्रीय स्तरावर षटकार मारतो आहे, हाच फरक आहे,’’ असे पंडय़ाने पुढे सांगितले. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने चार फलंदाजांना गमावल्यानंतर पंडय़ाने आत्मविश्वासाने ७८ धावांची खेळी साकारली. षटकाराच्या कौशल्याबाबत माहिती देताना पंडय़ा म्हणाला, ‘‘षटकार खेचणे एवढेच महत्त्वाचे नसते. सामना वाचणे हे अतिशय महत्त्वाचे असते. चेन्नईत झम्पा गोलंदाजीला असताना या गोलंदाजाला मी कधीही षटकार मारू शकेल, असा विश्वास निर्माण झाला होता. त्यामुळेच मी सातव्या षटकापर्यंत प्रतीक्षा केली. मग योग्य संधी साधून त्या एका षटकानिशी मी सामन्याचे चित्र पालटले.’’
पंडय़ा बहुतांशी वेळा महेंद्रसिंग धोनीनंतर सातव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरतो, मात्र रविवारी त्याला चौथ्या स्थानावर पाचारण करण्यात आले होते. याबाबत विचारले असता पंडय़ा म्हणाला, ‘‘मी कोणत्या क्रमांकावर फलंदाजीला उतरतो, त्यामुळे मला कोणताच फरक पडत नाही. मी त्याकडे आव्हान म्हणून पाहतो. संघासाठी उत्तम कामगिरी करण्याची ही संधी असते. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला जायचे आहे, अशी सूचना देण्यात आल्यामुळे त्या वेळी मला आनंद झाला. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रथमच इतक्या षटकांचा खेळ बाकी असताना मला फलंदाजीची संधी मिळाली.’’