भारत-पाकिस्तान या दोन देशांदरम्यान खेळला जाणारा प्रत्येक सामना हा एखाद्या युद्धासारखाच असतो. त्यातही जर सामना क्रिकेटचा असेल तर दोन्ही देशातील नागरिकांचं लक्ष याच सामान्याकडे असतं. काल २८ ऑगस्टला झालेला सामनाही असाच काहीसा होता. सामन्यामधील आक्रमकता मैदानावर स्पष्टपणे पाहायला मिळाली. अशा सामन्यांमध्ये मैदानावरील खेळाडूंमध्ये भांडणे होणे अगदी सामान्य आहे. कालच्या सामन्यादरम्यानही असाच एक प्रसंग पाहायला मिळाला. यावेळी हार्दिक पंड्याने पाकिस्तानचा यष्टीरक्षक मोहम्मद रिझवान याचा गळा पकडला.
भारताच्या उत्तम फलंदाजांपैकी एक असलेला सूर्यकुमार यादव १५व्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर बाद झाला. यानंतर हार्दिक पंड्या मैदानावर उतरला. मोहम्मद नवाजच्या गोलंदाजीदरम्यान हार्दिक धाव घेण्यासाठी पळाला. यावेळी त्याची आणि पाकिस्तानचा यष्टिरक्षक मोहम्मद रिझवानची टक्कर झाली. यावेळी हार्दिकने रिझवान याचा गळा पकडला. तिथे असलेल्या सर्वांनाच असं वाटलं की दोन्ही संघांमध्ये बाचाबाची होईल. मात्र, याच्या अगदी उलट दृश्य पाहायला मिळाले.
Ind vs Pak सामन्यानंतर ‘मारो मुझे मारो’ फेम मोमीनने घेतली विराटची भेट; Video पोस्ट करत म्हणाला…
हार्दिकने रिझवानला मिठी मारली आहे दोघेही हसू लागले. दोघांकडे बघून जणू ते खूप जुने मित्र आहेत असे वाटत होते. त्यावेळी सामना अत्यंत नाजूक परिस्थितीत होता. भारताला जिंकण्यासाठी ५० पेक्षा जास्त धावांची गरज होती. हार्दिक बाद झाला असता तर भारतासमोर अडचणी निर्माण होऊ शकल्या असत्या. मात्र या घटनेकडे दुर्लक्ष करून हार्दिकने फलंदाजीत आपला उत्साह दाखवला.
अखेरच्या षटकात पाकिस्तानला हरवण्यासाठी भारताला ७ धावांची गरज होती. शेवटच्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर हार्दिक पंड्याने षटकार ठोकून भारताचा विजय निश्चित केला. त्याने १७ चेंडूत नाबाद ३३ धावा केल्या. यादरम्यान त्याने ४ चौकार आणि १ षटकार लगावला. त्याचवेळी हार्दिकने रवींद्र जडेजासोबत अर्धशतकी भागीदारी केली.