Wasim Akram On Mohammad Shami: भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये जखमी हार्दिक पांड्याच्या जागी, वेगवान गोलंदाज शमीला जागा मिळाली होती. न्यूझीलंड विरुद्धच्या ऐतिहासिक सामन्यात शमीने पाच विकेट्स घेत रेकॉर्ड रचला होता. शमीच्या गोलंदाजीमुळे आयसीसीमधील न्यूझीलंडविरुद्ध भारताचे २० वर्षांचे पराभव सत्र संपुष्टात आले. आता रविवारी २९ ऑक्टोबरला टीम इंडियाचे शिलेदार इंग्लंडशी लढणार आहेत. या लढतीपूर्वी पाकिस्तानी माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रमने राहुल द्रविड, रोहित शर्माला काही सल्ले दिले आहेत. विश्वचषक २०२३ मध्ये रोहित शर्माचे मेन इन ब्लु, उपकर्णधार हार्दिक पांड्या नसतानाही एक तगडी टीम म्हणून सिद्ध होत आहेत, त्यामुळे कदाचित पांड्यामुळे तितकीशी पोकळी संघात निर्माण झालेली नाही असा सूर अक्रमच्या सल्ल्यात ऐकू येत आहे.
स्पोर्ट्सकीडाशी बोलताना वसीम अक्रम म्हणाला की, “पांड्याशिवायही हा संघ भक्कम दिसतोय. जर पांड्या फिट असेल तर उत्तमच पण आता पांड्याला पुन्हा टीममध्ये घेताना शमीला वगळणे कठीण आहे. मला वाटते की भारताने पांड्याला (इंग्लंडविरुद्ध) संघात परत घेण्याचा धोका पत्करू नये कारण जर का त्याला हॅमस्ट्रिंग किंवा क्वाडला दुखापत झाली असेल तर, कदाचित सुरुवातीला बरं वाटत असलं तरी सामन्यात खेळताना स्नायू ताणले जाऊ शकतात. त्यामुळे त्याला १०० टक्के बरे होऊ द्या आणि मग त्याला संघात घ्या.”
भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात विराट कोहलीची ९५ धावांची जबरदस्त खेळी असतानाही पाच विकेट्सच्या जोरावर शमीने सामनावीराचा पुरस्कार पटकावला. शमीने रविवारी पहिला विश्वचषक २०२३ सामना खेळताना,पहिल्याच चेंडूवर आपले खाते उघडले. शमी हा भारतासाठी वर्ल्ड कपमध्ये दोन वेळा पाच बळी घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे.
IND vs PAK: पाकिस्तानच्या हरण्याचं कारण वासिम अक्रमनं केलं उघड! म्हणाला, “महिन्यातून एकदा..”
यावर अक्रमने बीसीसीआयचे कौतुक करत म्हटले की, ” टीम इंडियाच्या उत्तम खेळप्रदर्शनाचे श्रेय संघ व्यवस्थापनाला जाते कारण तुम्ही बघू शकता जो ही खेळाडू प्लेइंग इलेव्हनमध्ये येतो तेव्हा तो तयार दिसतो. जेव्हा शमीचा चेंडू पीचवर आदळतो, तेव्हा तो कोणत्याही मार्गाने फिरू शकतो. म्हणूनच मला वाटते की शमी हाच योग्य सामनावीर आहे.”