आयसीसीने नुकत्याच जारी केलेल्या कसोटी क्रमवारीत अष्टपैलू हार्दिक पांड्याने फलंदाजांच्या यादीत चांगलीच मुसंडी मारली. त्याने चक्क ४५ स्थानाने भरारी घेत कसोटी क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत ६८ वे स्थान मिळवले. आतापर्यंत केवळ तीन कसोटी सामने खेळलेल्या पांड्याच्या कसोटी कारकिर्दीतील ही सर्वोत्कृष्ट रँकिंग आहे. त्याच्यासोबतच भारताचा सलामीवीर शिखर धवन आणि लोकेश राहुलने कसोटी कारकिर्दीतील आतापर्यंतची सर्वोकृष्ट रँकिंग मिळवली.
श्रीलंकेविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या कसोटी सामन्यात शिखर धवन आणि लोकेश राहुल या दोघांनी चांगली कामगिरी केली होती. श्रीलंकेविरुद्धच्या अखेरच्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यात ११९ धावांची खेळी करणाऱ्या शिखर धवन कसोटी क्रमवारीत ३८ व्या स्थानावरुन २८ व्या स्थानावर झेप घेतली. तर लोकेश राहुलने अव्वल दहामध्ये स्थान मिळवले. राहुलने नवव्या स्थानावर कब्जा केलायं. यापूर्वी राहूलने जूलैमध्ये नवव्या स्थानावर पोहोचला होता. मात्र त्यानंतर त्याची दोन क्रमांकाने घसरण झाली होती.
ज्याप्रमाणे फलंदाजांच्या क्रमवारीत सुधारणा झाली. त्याचप्रमाणे गोलंदाजीत कुलदीप यादवच्या रँकिंगमध्येही सुधारणा झाली. पूर्वीच्या रँकिंगमध्ये तब्बल २९ गोलंदाजांना मागे टाकून तो ५८ व्या स्थानावर पोहोचला. कुलदीपने श्रीलंकेविरुद्धच्या अखेरच्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात ४ तर दुसऱ्या डावात १ बळी असे एकूण ५ बळी टिपले होते.
अष्टपैलू खेळाडूच्या यादीतून रवींद्र जाडेजाची घसरण झाली असून बांगलादेशच्या शाकिब अल हसनने पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले. तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटीत जाडेजावर बंदी घालण्यात आली होती. या सामन्यातील अनुपस्थितीमुळे शाकिब अवघ्या एका गुणाने जाडेजापेक्षा वर्चढ ठरला. जाडेजाचे अष्टपैलूच्या यादीतील स्थान घसरले असले तरी गोलंदाजीत त्याने अव्वल स्थान कायम राखले आहे. कसोटी क्रमवारीत भारतीय संघ अव्वल स्थानी कायम असून श्रीलंका सातव्या स्थानावर आहे.