भारताचे दिग्गज खेळाडू आणि माजी कर्णधार सुनील गावस्कर यांना गोलंदाजांचा कर्दनकाळ मानले जात असे. आपल्या पिढीतील एक सर्वोत्तम फलंदाज म्हणून त्याची ख्याती होती. जोएल गार्नर, मायकल होल्डिंग्स, गॅरी सोबर्स यासारख्या वेगवान गोलंदाजांचा गावस्कर यांनी धीराने सामना केला होता. तत्कालीन कर्णधार कपिल देव याचाही गावस्कर यांना पाठिंबा आणि सहाय्य मिळायचे. या आपल्या कर्णधाराची भारताच्या सध्याच्या संघात असलेल्या एका खेळाडूशी करण्यात आलेली तुलना गावस्कर यांना अजिबात रुचली नाही.
काही दिवसांपासून भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याची तुलना कपिल देव याच्याशी करण्यात येत आहे. या बाबत गावस्कर यांना मत विचारण्यात आले. त्यावेळी गावस्कर तुलना योग्य नसल्याचे सांगितलं. श्रीलंकाविरुद्ध झालेल्या मालिकेत भारताचा हार्दिक पांड्या याची तुलना कपिल देव याच्याशी करण्यात आली होती.
‘कपिल देव याची तुलना सध्याच्या संघातील कोणत्याही खेळाडूंशी केली जाऊ शकत नाही. कपिलसारखा खेळाडू हा पिढीतून एकदा नव्हे, तर शतकात एखादाच असतो. जसे सर डॉन ब्रॅडमन, सचिन तेंडुलकर हे शतकात एखादेच असतात, तसेच कपिल देवदेखील शतकात एखादाच बनतो. प्रत्येक पिढीत कपिलसारखा खेळाडू तयार होत नाही. त्यामुळे त्याचाशी कोणाचीही तुलना करणे योग्य नाही’, असे स्पष्ट मत गावस्कर यांनी व्यक्त केले.