IND vs ENG Parthiv Patel criticizes Hardik Pandya : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत यजमान संघाला तिसऱ्या सामन्यात २६ धावांनी धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला. राजकोट येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने प्रथम गोलंदाजी करत इंग्लंडला १७१/९ पर्यंत रोखले. प्रत्युत्तरात लक्ष्याचा पाठलाग करताना, भारताने नियमित अंतराने विकेट्स गमावल्या आणि ९ बाद १४५ धावाच करता आल्या. या सामन्यात भारताची संपूर्ण बॅटिंग लाईनअप सपशेल अपयशी ठरली. सामन्यानंतर पार्थिव पटेलने हार्दिक पंड्याच्या फलंदाजीवर टीका केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पार्थिव पटेलची हार्दिक पंड्यावर टीका –

हार्दिक पंड्याने लक्ष्याचा पाठलाग करताना ३५ चेंडूत ४० धावांची खेळी साकारली. भारताचा माजी यष्टीरक्षक पार्थिव पटेलने सामन्यानंतरच्या शोमध्ये हार्दिकच्या संथ सुरुवातीवर टीका केली. स्टार स्पोर्ट्सच्या मॅचनंतरच्या शोमध्ये पार्थिव म्हणाला, “टी-२० क्रिकेटमध्ये सेट होण्यासाठी २०-२५ चेंडू लागू नयेत. मी समजू शकतो की तुम्ही सेट होण्यासाठी वेळ घेत आहात. पण तुम्हाल स्ट्राईक रोटेट करत राहावे लागेल. हार्दिकने ३५ चेंडूत ४० धावा केल्या असतील, पण त्याच्या डावाच्या सुरुवातीला बरेच डॉट बॉल खेळले. ज्यामुळे इतर फलंदाजावर दबाव वाढला.”

केव्हिन पीटरसनचे ध्रुव जुरेलबद्दल वक्तव्य –

पार्थिवशिवाय केव्हिन पीटरसननेही ध्रुव जुरेलला आठव्या क्रमांकावर पाठवण्याच्या टीम इंडियाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले आहेत. पीटरसन म्हणाला, ‘‘भारताने फलंदाजीचा क्रम योग्य ठेवला नाही. ध्रुव जुरेल हा कुशल फलंदाज आहे. त्याला बॅटिंग ऑर्डरमध्ये खाली ठेवणे योग्य नव्हते. मला माहीत आहे की तुमचे सर्वोत्तम फलंदाज पुढे फलंदाजी करतात. डावे आणि उजवे हाताचे फलंदाजाचे संयोजन चौथ्या क्रमांकापर्यंत ठीक आहे. पण त्यानंतर तुम्ही तुमचे सर्वोत्तम फलंदाज पाठवले पाहिजेत. जुरेल हा योग्य फलंदाज आहे. त्याला मोठी खेळी खेळता आली असती.”

वरुण चक्रवर्तीने केले प्रभावित –

या सामन्यात भारतासाठी फिरकीपटू वरुण चक्रवर्ती हा सकारात्मक पैलू होता. त्याने पाच विकेट्स घेतल्या, पण संघाला विजय मिळवता आला नाही. २०२१ मध्ये टीम इंडियातून बाहेर पडलेल्या या गोलंदाजाने जबरदस्त पुनरागमन केले आहे. गेल्या वर्षी तो संघात परतला आणि तेव्हापासून तो वर्चस्व गाजवत आहे. त्याने १० सामन्यात २७ विकेट्स घेतल्या आहेत. राजकोट टी-२० मध्ये वरुणने इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर, जेमी स्मिथ, जेमी ओव्हरटन, ब्रेडन कार्स आणि जोफ्रा आर्चर यांना बाद केले होते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hardik pandya knock put pressure on other india batters say parthiv patel after team india defeat against england vbm