Hardik-Natasa Divorce with 70% Share Properties: गेल्या काही दिवसांपासून हार्दिक पंड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक यांच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा सध्या रंगली आहे. चार वर्षांपूर्वी हार्दिक पंड्या आणि नताशा स्टॅनकोविक हे विवाहबंधनात अडकले होते. त्यांना अगस्त्य नावाचा एक मुलगाही आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात सारंकाही आलबेल नसून लवकरच ते घटस्फोट घेणार असल्याचं बोललं जात आहे. यासंदर्भात हार्दिक किंवा नताशा या दोघांकडूनही कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, नताशानं यासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर दोनच शब्दांत दिलेलं उत्तर तर्क-वितर्कांना उधाण देणारं ठरलं आहे.
मूळची सर्बियाची असणारी मॉडेल नताशा स्टॅनकोविक आणि मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या यांची जानेवारी २०२०मध्ये दुबईत एंगेजमेंट झाली होती, तर त्याच वर्षी ३१ मे रोजी हे दोघे विवाहबंधनात अडकले. त्यांच्या लग्नाचीही क्रीडाविश्व व कलाविश्वात बराच काळ चर्चा रंगली होती. गेल्या काही महिन्यांपासून खराब कामगिरी आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार झाल्यानंतर झालेलं ट्रोलिंग यामुळे हार्दिकवर दडपण असल्याचे दावे करण्यात आले आहेत. अनेक माजी क्रिकेटपटूंनीही यावर भाष्य केलं. आयपीएलमधील हार्दिकच्या खराब कामगिरीमुळे त्याच्या विश्वचषकातील समावेशावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. मात्र, अखेर त्याचा टी-२० विश्वचषक स्पर्धेत समावेश झाला.
खराब कामगिरी, मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद स्वीकारल्यानंतर आलेलं अपयश आणि भारतीय संघातील समावेशाबाबतची अनिश्चितता या सर्व पार्श्वभूमीवर हार्दिक पंड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. इतकंच नाही तर हार्दिक पंड्याला घटस्फोटानंतरची पोटगी म्हणून नताशाला त्याच्या संपत्तीतील तब्बल ७० टक्के हिस्सा द्यावा लागणार असल्याचंही बोललं जात आहे. हार्दिकची संपत्ती जवळपास दीडशे कोटींच्या घरात असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे नताशाला मिळणाऱ्या कोट्यवधींच्या पोटगीची चर्चा होत आहे.
खरंच घटस्फोट की फक्त चर्चा?
दरम्यान, हार्दिक व नताशा खरंच घटस्फोट घेणार आहेत की या फक्त चर्चाच आहेत? अशीही शंका उपस्थित केली जात आहे. कारण या दोघांकडून अद्याप त्यावर कोणतंही अधिकृत भाष्य करण्यात आलेलं नाही. पण टीम इंडिया मुंबई विमानतळावरून अमेरिकेतील टी-२० वर्ल्डकपसाठी रवाना होताना तिथे हार्दिकची अनुपस्थिती चर्चांना खतपाणी घालणारी ठरल्याचं बोललं जात आहे. त्यातच नताशाला पत्रकारांनी यासंदर्भात प्रश्न विचारल्यानंतर तिनं दिलेलं उत्तरही तर्क-वितर्कांना उधाण देणारं ठरलं आहे.
हार्दिक पंड्याच्या संपत्तीतील इतका मोठा हिस्सा होणार नताशाच्या नावे? घटस्फोटाच्या चर्चेत नवा ट्विस्ट
नेमकं काय म्हणाली नताशा स्टॅनकोविक?
नताशा स्टॅनकोविकचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ‘इंडिया फोरम्स’च्या एका एक्स हँडलवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. नताशा एका हॉटेलमधून बाहेर पडत असताना पत्रकारांनी तिला हार्दिक पंड्यासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांबाबत विचारणा केली. त्यावर “थँक यू व्हेरी मच”, एवढंच बोलून नताशानं काढता पाय घेतला. एकीकडे या प्रश्नावर नताशानं बोलणं टाळलं असलं, तरी दुसरीकडे तिनं घटस्फोटाच्या चर्चा पूर्णपणे फेटाळूनही लावल्या नसल्यानं या चर्चांमध्ये तथ्य असल्याचे दावे आता केले जात आहेत.