टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये भारतीय क्रिकेट संघाचा पराभव झाल्यानंतर बीसीसीआयने संघात मोठे बदल करण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार आता भारतीय क्रिकेट संघाच्या टी-२० क्रिकेट खेळण्याच्या पद्धतीत बदल करण्याच्या दिशेनं पावलं उचलली जात आहेत. विश्वकप झाल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ न्यूझीलंड दौऱ्यावर पोहोचला आहे. या दौऱ्यासाठी भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याकडे कर्णधारपदाची धुरा सोपवली असून भारताने या मालिकेत १-० ने विजय संपादन केलं. त्यामुळं आता हार्दिक पंड्याकडे टी-२० क्रिकेटची कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
ऑस्ट्रेलियात झालेल्या विश्वचषकानंतर भारतीय क्रिकेट संघातून वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाईल, अशा चर्चांना उधाण आलं होतं. यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली आणि के एल राहुलसारख्या खेळाडूंचा समावेश आहे. तसंच हार्दिक पंड्याकडे टी-२० चं नेतृत्व करण्यासाठी जबाबदारी देण्याची मागणी केली गेली. हार्दिकने त्याच्या संघाला आयपीएलचंही जेतेपद पटकावून दिलं होतं. इनसाइड स्पोर्ट्सने दिलेल्या एका रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी टी-२० क्रिकेटच्या भविष्यातील कारकिर्दीबाबत कर्णधार रोहित शर्मासोबत चर्चा केली. रोहित भारताच्या टी-२० क्रिकेटचं कर्णधारपद सोडण्यासाठी तयार आहे. कारण रोहितला एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये अधिक सजगपणे लक्ष देता येईल.
तसंच भारतीय क्रिकेट संघात नवीन निवड समितीची घोषणा केली जाईल, अशी माहिती समोर येत आहे. त्यानंतर टी-२० क्रिकेटसाठी हार्दिक पंड्याकडे नेतृत्व करण्याची धुरा सोपवण्यात आली. रोहित शर्मा भारतीय क्रिकेट संघासाठी खूप काही करु शकतो, परंतु, त्याच्याकडे खूप जबाबदाऱ्या आहेत. त्यामुळे त्याच्यावर असलेला अतिरिक्त भार कमी करण्याची गरज आहे. तसंच वयोमानाचा प्रश्नही उद्भवतो, असं बीसीसीआयच्या सूत्रांचं म्हणणं आहे.
भारतीय क्रिकेट संघ आता २०२४ मध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या अनुषंगाने पुढची रणनीती आखत आहे. कारण, हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात भारतीय संघ जेव्हा न्यूझीलंडला पोहोचला, त्यावेळी सर्व खेळाडू्ंच्या कामगिरीवर लक्ष वेधलं गेलं. त्यामुळे आगामी होणाऱ्या क्रिकेट स्पर्धांमध्ये भारतीय संघ दोन कर्णधारांच्या नेतृत्वात खेळेल. यामध्ये टी-२० क्रिकेटसाठी हार्दिक तर एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटसाठी रोहित शर्मा नेतृत्व करणार आहे.