Hardik Pandya Reclaims No 1 T20I All Rounder in ICC Rankings: टी-२० विश्वचषक विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या हार्दिक पंड्याने आयसीसी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. हार्दिक पंड्या भारतीय संघाचा एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्याने आपली जबरदस्त कामगिरी कायम ठेवत आयसीसी अष्टपैलू खेळाडूंच्या टी-२० क्रमवारीत पहिले स्थान गाठले आहे. अलीकडेच झालेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही हार्दिक पांड्याने चांगली कामगिरी केली, त्याचा फायदा त्याला आयसीसी क्रमवारीत झाला आहे. हार्दिक पंड्या आयसीसी क्रमवारीत नंबर १ टी-२० अष्टपैलू खेळाडू बनला आहे. पंड्याने २ स्थानांनी झेप घेत हा मोठा टप्पा गाठला.
हार्दिक पंड्याने लियाम लिव्हिंगस्टोनला मागे टाकत पहिले स्थान गाठले आहे. हार्दिक पंड्याचे रेटिंग गुण आता २४४ आहेत. हार्दिक पंड्याने २०२४ मध्ये दुसऱ्यांदा ICC पुरुषांच्या टी-२० अष्टपैलू क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. या वर्षी हार्दिकने टी-२० क्रिकेटमध्ये ३५२ धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने यावर्षी १६ विकेट्सही आपल्या नावावर केल्या आहेत. हार्दिकने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर शेवटच्या टी-२० सामन्यात चेंडूने अप्रतिम कामगिरी केली होती. त्याने ३ षटकात केवळ ८ धावा देऊन १ विकेट मिळवली होती. यादरम्यान त्याने एक मेडन ओव्हरही टाकली.
हेही वाचा – IND vs SA T20 मालिकेनंतर ICC ने ‘या’ खेळाडूला दिली शिक्षा, पण नेमकं कारण तरी काय?
हार्दिक २४४ रेटिंग गुणांसह टी-२० अष्टपैलूंच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे तर नेपाळचा दीपेंद्र सिंग ऐरी दुसऱ्या स्थानावर आहे. लियाम लिव्हिंगस्टोन २ स्थानांनी घसरून तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाचा मार्कस स्टॉइनिस चौथ्या तर श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा पाचव्या स्थानावर आहे. अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी सहाव्या तर झिम्बाब्वेचा सिकंदर रझा सातव्या स्थानावर आहे.
हार्दिक पंड्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या कसोटी संघाचा भाग नाही. तो बराच काळ कसोटी संघाबाहेर आहे. पण आता पंड्या लवकरच त्याचा भाऊ कृणाल पंड्याच्या नेतृत्वाखाली आगामी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये बडोद्यासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळताना दिसणार आहे. तब्बल ६ वर्षांनंतर तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहे.