Hardik Pandya Statement on Fitness : श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा झाल्यापासून हार्दिक पंड्या चर्चेत आहे. मात्र, शनिवारी त्याचा स्पोर्ट्स अपेरल ब्रँड लॉन्च करताना तो पहिल्यांदाच लोकांसमोर दिसला. पत्नी नताशाबरोबर घटस्फोट आणि टी-२० कर्णधारपदावरून बाजूला झाल्यानंतर त्याची ही पहिलीच सार्वजनिक उपस्थिती होती. यावेळी त्याने नताशा आणि कर्णधारपदावर बोलणे टाळले. तो फक्त आपल्या फिटनेसवर बोलताना दिसला. तो रोहित शर्माच्या टी-२० निवृत्तीनंतर भारतीय संघाचा भावी कर्णधार मानला जात होता, मात्र, त्याच्याऐवजी सूर्यकुमार यादवची कर्णधार म्हणून वर्णी लागली.
शनिवारी या कार्यक्रमात हार्दिक पंड्याने फिटनेस वगळता इतर मुद्द्यांवर मौन पाळले, ज्याने त्याचे आयुष्य चर्चेत आहे. सध्या तो मैदानात आणि मैदानाबाहेर अनेक आव्हानांना तोंड देत आहे, पण या आव्हानांची एकही सुरकुती त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हती, जी त्याने चांगली लपवून ठेवली होती. पंड्या म्हणाला, ‘जेव्हा आपले शरीर थकत नाही, तेव्हा आपले मन थकते. आयुष्यात कितीतरी वेळा जेव्हा मी माझ्या सीमा वाढवण्यास सक्षम होतो, नेमके तेव्हाच माझे मन थकले, पण मी माझ्या शरीराला पुढे जाण्यास सांगत राहिलो.’
हार्दिक पंड्याला एकाच महिन्यात दुहेरी धक्का –
या महिन्याच्या सुरुवातीला हार्दिकने टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या संघासोबत खुल्या बसमध्ये सेलिब्रेशन केले होते. पण काही आठवड्यांतच त्याने काही महत्त्वाच्या गोष्टी गमावल्या. रोहित शर्माच्या जागी भारताचा टी-२० विश्वचषक उपकर्णधार पांड्याकडे पाहिलं जात होतं, पण त्याच्या घटस्फोटाच्या घोषणेसोबतच त्याला कर्णधारपदावरून हटवल्याची बातमी आली, पण या सगळ्याचा पंड्यावर कोणताही परिणाम दिसून आला नाही.
फिटनेसबाबत हार्दिकने पंड्या काय म्हणाला?
३० वर्षीय हार्दिक पंड्या म्हणाला, ‘कधीकधी विचारांशिवाय मन स्थिर ठेवणे खूप महत्त्वाचे असते. जेव्हा माझा ट्रेनर मला १० पुश अप करायला सांगतो, तेव्हा मी नेहमी १५ पुश अप करतो. यामुळे माझा स्टॅमिना वाढला आहे आणि मला वाटते की ज्यांना फिटनेसवर काम सुरू करायचे आहे त्यांनी यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.’
हार्दिक पुढे म्हणाला, ‘मुद्दा असा आहे की काहीवेळा तुमचे मन साफ करणे खूप महत्वाचे असते. कारण तुमच्या शरीरात तुम्ही विचार करू शकता त्यापेक्षा बरेच काही आहे. त्यामुळे दररोज तुम्हाला येणारे अडथळे पार करायला सुरू करा. कारण मानवी शरीर ही देवाची इतकी सुंदर निर्मिती आहे की ते तुम्हाला हवे तसे बनवेल, फक्त त्यासाठी थोडे कष्ट करावे लागतात.’
हेही वाचा – Team India : आशिया कपमध्ये टीम इंडियाला मोठा धक्का, ‘मॅच विनर’ खेळाडू संपूर्ण स्पर्धेतून बाहेर
हार्दिक कर्णधारपदासाठी नवा प्रशिक्षक गौतम गंभीरची पहिली पसंत नसेल, परंतु एकेकाळी मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी त्याचे वर्णन देशातील एकमेव प्रतिभावान वेगवान गोलंदाज अष्टपैलू म्हणून केले होते. हार्दिक आता २७ जुलैपासून श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत खेळताना दिसणार आहे. सूर्यकुमार संघाची धुरा सांभाळेल, तर शुबमन गिल संघाचा उपकर्णधार आहे. त्याचबरोबर हार्दिक एकदिवसीय मालिकेत टीम इंडियासाठी खेळताना दिसणार नाही.