अष्टपैलू हार्दिक पंड्या दुखापतीतून न सावरल्यामुळे वर्ल्डकप स्पर्धेत खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. हार्दिक पंड्याऐवजी वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाला संघात समाविष्ट करण्यात आलं आहे. आयसीसीच्या तांत्रिक समितीने कृष्णाच्या समावेशाला परवानगी दिली आहे. संतुलन राखण्यादृष्टीने अष्टपैलू हार्दिक भारतीय संघात असणं अत्यावश्यक होतं. १० षटकं गोलंदाजी, किमान १० ते १२ षटकं फलंदाजी, उत्तम क्षेत्ररक्षण आणि संघाचं उपकर्णधारपद अशा अनेक दृष्टीने हार्दिकचं असणं महत्त्वाचं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बांगलादेशविरुद्ध पुणे येथे झालेल्या लढतीत हार्दिकच्या घोट्याला दुखापत झाली होती. मैदानात त्याच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर त्याने चालण्याचा प्रयत्न केला. रनअपमध्ये धावता येतंय का ते पाहिलं पण दुखापतीचं स्वरुप गंभीर असल्याने तो पॅव्हेलियमध्ये परतला. उर्वरित सामन्यात तो खेळायला आला नाही. त्याच्या दुखापतीसाठी एक्स रे घेण्यात आले. त्यातून ही दुखापत गंभीर असल्याचंच स्पष्ट झालं.

कृष्णाने १९ वनडे सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. वर्ल्डकपआधी झालेल्या मालिकेत तो खेळला होता. हार्दिकच्या अनुपस्थितीत संधी मिळालेल्या मोहम्मद शमीने दमदार कामगिरी करत संघाची चिंता मिटवली आहे. शमीने ३ सामन्यात १४ विकेट्स पटकावल्या आहेत. हार्दिक संघात नसल्यामुळे भारतीय संघव्यवस्थापनाला दोन बदल करावे लागले होते. सूर्यकुमार यादवलाही संघात स्थान मिळाले.

हार्दिकच्या अनुपस्थितीत अक्षर पटेल संघात येण्याची शक्यता होती. मात्र रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव हे फिरकीपटू उत्तम कामगिरी करत असल्याने अक्षरच्या नावाला पसंती देण्यात आली नाही. या दोघांच्या बरोबरीने अनुभवी रवीचंद्रन अश्विन संघात असल्याने अक्षरचं नाव मागे पडलं. हार्दिकऐवजी अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरच्या नावाचीही चर्चा झाली होती.

भारतीय संघाने सातपैकी सात सामने जिंकत सेमी फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. भारताच्या आता दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्सविरुद्ध लढत होणार आहे. दुखापतीचं स्वरुप गंभीर असल्याने हार्दिक बंगळुरूला एनसीएमध्ये दाखल झाला होता. न्यूझीलंड, इंग्लंड आणि श्रीलंकेविरुद्ध तो खेळला नाही. दक्षिण आफ्रिकेच्या महत्त्वपूर्ण लढतीत त्याची खेळण्याची शक्यता मावळली असतानाच ही बातमी आली आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध हार्दिकने एक विकेट मिळवली आणि नाबाद ११ धावांची खेळी केली. अफगाणिस्तानविरुद्ध हार्दिकने २ विकेट्स पटकावल्या. त्याला फलंदाजीला यावंच लागलं नाही. पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत हार्दिकने इमाम उल हक आणि मोहम्मद नवाझला तंबूत धाडलं. फलंदाजीची संधीच मिळाली नाही. बांगलादेशविरुद्ध गोलंदाजी करताना पहिल्याच षटकात लिट्टन दासने मारलेला फटका अडवताना हार्दिकच्या पायाला दुखापत झाली. हार्दिकचं षटक विराटने पूर्ण केलं होतं.

३०वर्षीय हार्दिकने ८६ वनडेत भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. भारतीय संघात गोलंदाजी करु शकेल असे फलंदाज नसल्याने अष्टपैलू हार्दिक संघात असणं आवश्यक होतं. एखाद्या गोलंदाजाला सूर गवसला नाही तर कामचलाऊ गोलंदाजाला पाचारण करावं लागतं. हार्दिक संघात असला की कर्णधाराची ही चिंता मिटते कारण तो दोन्हीकडे योगदान देतो. महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीनंतर हार्दिकने फिनिशरची भूमिका यशस्वीपणे साकारली आहे. गेल्या वर्षी हार्दिकच्या नेतृत्वात गुजरात टायटन्स संघाने पदार्पणातच जेतेपदावर नाव कोरलं होतं. यानंतर हार्दिकने भारताच्या ट्वेन्टी२० संघाचंही नेतृत्व केलं होतं. खेळाडूंची मोट बांधण्यात तो यशस्वी झाला होता. कर्णधार रोहित शर्मा आणि हार्दिक आयपीएल स्पर्धेत अनेक वर्ष मुंबई इंडियन्स संघासाठी खेळत होते. त्यामुळे त्यांच्यातला ताळमेळही उत्तम होता.

२०१८ आशिया चषक स्पर्धेत हार्दिक पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत दुखापतग्रस्त झाला होता. हार्दिकच्या पाठीला दुखापत झाली होती. चालताना त्रास होत असल्यामुळे हार्दिकला मैदानातून स्ट्रेचरवरुन न्यावं लागलं होतं. २०२० आणि २०२१ आयपीएल स्पर्धेत दुखापतीमुळे हार्दिकला गोलंदाजी करता आली नव्हती. या दुखापतीमुळे प्रदीर्घ काळ हार्दिकला खेळता आलं नाही. २०२२ आयपीएल हंगामाद्वारे हार्दिकने दिमाखात पुनरागमन केलं होतं.

वर्ल्डकप स्पर्धेत प्रत्येक संघाला दुखापतींनी ग्रासलं आहे. श्रीलंकेचा कर्णधार दासून शनका, लहिरु कुमारा आणि मथिशा पथिराणा दुखापतग्रस्त झाले. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने दुखापतीतून सावरत पुनरागमन केलं. मात्र बांगलादेशविरुद्धच्या पहिल्याच लढतीत त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली. दुखापत गंभीर असल्याने तो अजूनही खेळू शकलेला नाही. वेगवान गोलंदाज मॉट हेन्रीचे मांडीचे स्नायू दुखावल्याने तो स्पर्धेबाहेर गेला आहे. त्याच्याऐवजी कायले जेमिसनला संधी मिळाली आहे. जेमी नीशाम, लॉकी फर्ग्युसन, मार्क चॅपमन हे तिघे विविध दुखापतींनी ग्रस्त आहेत. अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे टीम साऊदी बरेच सामने निवडीसाठी उपलब्ध नव्हता.

स्पर्धेआधी दक्षिण आफ्रिकेचा अँनरिक नॉर्किया आणि सिसांदा मगाला दुखापतग्रस्त झाले होते. पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज नसीम शहा दुखापतीमुळे स्पर्धेत खेळत नाहीये. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज रीस टोपले दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेला. गोल्फ खेळताना पडल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल इंग्लडविरुद्धच्या लढतीत खेळू शकणार नाहीये. गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर ट्रॅव्हिस हेडच्या हाताला गंभीर दुखापत झाली होती. यामुळे तो वर्ल्डकपच्या पूर्वाधात खेळूच शकला नाही.

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार तेंबा बावूमा पोट बिघडल्याने दोन लढती खेळू शकला नाही. श्रीलंकेचे वानिंदू हासारंगा, ऑस्ट्रेलियाचा अॅश्टन अगर, बांगलादेशचा इबादत होसेन दुखापतग्रस्त झाल्याने त्यांची वर्ल्डकप संघात निवड होऊ शकली नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hardik pandya ruled out of world cup indian team sufferes setback prasidh krishna included in the squad psp
Show comments