Hardik Pandya Out Of World Cup 2023: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारताला मोठा धक्का बसला आहे. स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या उर्वरित विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडला. त्याच्या घोट्याला दुखापत झाली होती. मात्र, आता विश्वचषकातून बाहेर झाल्यानंतर हार्दिक पांड्याची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्याबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. तसेच संघासोबत राहून पाठिंबा देत राहीन, असे हार्दिकने म्हटले आहे. भारताला सध्या साखळी फेरीत आणखी दोन सामने खेळायचे आहेत. तत्पूर्वी भारतीय संघाने उपांत्य फेरी गाठली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हार्दिक पांड्याच्या जागी प्रसिद्ध कृष्णाला मिळाली संधी –

गेल्या महिन्यात पुण्यात बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी करताना हार्दिकच्या डाव्या घोट्याला दुखापत झाली होती. आता ही पुष्टी झाली आहे की, ३० वर्षीय खेळाडू वेळेत बरा होऊ शकला नाही. हार्दिकच्या जागी प्रसिद्ध कृष्णाचा संघात समावेश करण्यात आला आहे. प्रसिद्धला विश्वचषकाचा अनुभव नाही आणि प्रथमच विश्वचषक संघात त्याचा समावेश करण्यात आला आहे. प्रसिद्धला बॅकअप म्हणून तयार राहण्यास सांगण्यात आले होते आणि तो एनसीए बंगलळुरु येथील एनसीएमध्ये होता. शनिवारी स्पर्धेच्या इव्हेंट टेक्निकल कमिटीकडून मान्यता मिळाल्यानंतर त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला.

हार्दिक पांड्या काय म्हणाला?

हार्दिक पांड्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट करताना लिहिले, “मी विश्वचषकातून बाहेर झालो आहे, विश्वचषकात उर्वरित सामने मी खेळू शकणार नाही. हे पचवायला खूप अवघड आहे. मी संघासोबत उत्कटतेने असेन आणि प्रत्येक सामन्यातील प्रत्येक चेंडूवर त्यांना प्रोत्साहन देईन. भारतीय संघाला माझ्या शुभेच्छा. मला मिळालेल्या प्रेम आणि समर्थनाबद्दल खूप खूप धन्यवाद. हे अगदी अविश्वसनीय आहे. मला खात्री आहे की आपला संघ सर्वांना अभिमान वाटेल, अशी कामगिरी करेल.”

हार्दिक पांड्याला कशी झाली होती दुखापत?

वास्तविक, बांगलादेशविरुद्धच्या सामन्यादरम्यान हार्दिकने लिटन दासचा फटका उजव्या पायाने रोखण्याचा प्रयत्न केला होता. यादरम्यान त्याचा तोल गेला आणि चुकीने तो डाव्या पायावर पडला. यानंतर, उठताना, त्याला खूप वेदना होताना दिसत होत्या आणि तो लंगडत होता. काही वेळातच फिजिओला मैदानावर बोलावण्यात आले. यावेळी त्याच्यासोबत विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा हे दोन वरिष्ठ खेळाडू होते. फिजिओ आल्यानंतर सुमारे पाच मिनिटे सामना थांबला.

हेही वाचा – World Cup 2023: हार्दिक पंड्या वर्ल्डकपबाहेर; भारतीय संघाला धक्का

फिजिओने हार्दिकच्या डाव्या पायावर पट्टी लावली आणि पेन किलर स्प्रेही मारला, पण आराम मिळाला नाही. हार्दिकने उठून पुन्हा गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला, पण तो करू शकला नाही. अशा परिस्थितीत कोणताही विलंब न करता आणि कोणतीही जोखीम न घेता रोहितने हार्दिकला फिजिओसोबत मैदानाबाहेर पाठवले. तोपर्यंत हार्दिकने पहिल्या षटकातील तीन चेंडू टाकले होते. उर्वरित तीन चेंडू विराट कोहलीने टाकले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hardik pandya says i am out of the wc i will not be able to play in the remaining part of the world cup 2023 vbm
Show comments