Hardik Pandya emotional six months journey: टी२० वर्ल्डकप विजयात अष्टपैलू योगदान देणाऱ्या हार्दिक पंड्यासाठी गेले सहा महिने रोलरकोस्टर राईडप्रमाणे राहिले आहेत. गुरुवारी हार्दिकने घटस्फोटासंदर्भात घोषणा केली. आमच्यासाठी हा कठीण निर्णय होता असं हार्दिकने पोस्टमध्ये लिहिलं. मुलाच्या संगोपनासाठी आम्ही दोघेही कटिबद्ध असू असंही हार्दिकने म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वीच वर्ल्डकपविजेता ठरलेला हार्दिक वैयक्तिक आयुष्यात कठीण कालखंडातून जात आहे. गेल्या सहा महिन्यात हार्दिकच्या कारकीर्दीत घडलेल्या घटनांचा घेतलेला आढावा.
वनडे वर्ल्डकपमध्ये दुखापतग्रस्त, उर्वरित सामन्यांना मुकला
गेल्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात वनडे वर्ल्डकप स्पर्धेत बांगलादेशविरुद्ध पुणे इथल्या सामन्यात लिट्टन दासने मारलेला स्ट्रेट ड्राईव्ह रोखण्याच्या प्रयत्नात हार्दिक दुखापतग्रस्त झाला होता. त्याच्या घोट्याला दुखापत झाली. त्याला स्ट्रेचरवरून उपचारासाठी न्यावं लागलं होतं. दुखापतीचं स्वरुप गंभीर असल्याने हार्दिक त्या सामन्यात खेळू शकला नाही. दुखापतीतून सावरण्यासाठी वेळ लागणार असल्याने तो उर्वरित वर्ल्डकपचे सामने खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं. भारतीय संघासाठी तो मोठा धक्का होता. कारण हार्दिकच्या समावेशामुळे संघव्यवस्थापनाला अतिरिक्त गोलंदाज किंवा फलंदाज खेळवता येत होता. हार्दिक स्पर्धेबाहेर गेल्यामुळे वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला संधी मिळाली आणि त्याने या संधीचं सोनं केलं. ७ सामन्यात २४ विकेट्स घेत शमी स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स पटकावणारा गोलंदाज ठरला.
हेही वाचा: “जब मुझे रोना भी था…” पत्नी नताशापासून विभक्त झाल्यानंतर हार्दिकचं ‘ते’ वक्तव्य व्हायरल
गुजरात टायटन्सकडून ट्रेड ऑफची चर्चा
आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स संघाचं २०२२ मध्ये पदार्पण झालं. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात खेळणाऱ्या गुजरातने पहिल्यावहिल्या हंगामात जेतेपदावर नाव कोरण्याचा पराक्रम केला. अनेक संघांना दशकभरापेक्षा जास्त खेळूनही जेतेपद पटकावता आलेलं नाही. अशा परिस्थितीत हार्दिकच्या संघाने मिळवलेलं यश स्पृहणीय होतं. हार्दिकने प्रशिक्षक आशिष नेहरा यांच्या साथीने संघाची मोट बांधली. फलंदाजी, गोलंदाजीत तसंच कर्णधार म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिलं. एका हंगामाचा चमत्कार न राहता गुजरात संघाने २०२३ मध्येही दिमाखदार कामगिरी केली. गुजरातने फायनलमध्ये धडक मारली. फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाने त्यांना पराभूत केलं. दोन हंगाम संघाची कामगिरी उत्तम राहिली. शुबमन गिल, मोहम्मद शमी, डेव्हिड मिलर, रशीद खान या मोठ्या खेळाडूंनी संघाच्या विजयात निर्णायक योगदान दिलं. मात्र असं असूनही यंदाच्या आयपीएल हंगामाआधी हार्दिक गुजरातकडून मुंबईकडे ट्रेडऑफ होणार अशा चर्चा सुरू झाल्या. दोन हंगामांपूर्वी मुंबईनेच हार्दिकला रिटेन न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर गुजरातने हार्दिकला ताफ्यात समाविष्ट करत कर्णधारपदी नेमलं. मुंबईने तेव्हा झालेली चूक सुधारण्याचा निर्णय घेतला. जवळपास दोन महिने या ट्रेडऑफसंदर्भात उलटसुलट बातम्या येत राहिल्या. मात्र याबाबत मुंबई इंडियन्स, गुजरात टायटन्स आणि स्वत: हार्दिकने कोणतंही भाष्य केलं नाही.
मुंबई इंडियन्सनने ट्रेडऑफमध्ये घेतलं
सगळ्या चर्चांना पूर्णविराम देत मुंबई इंडियन्स संघाने हार्दिकला ट्रेडऑफच्या माध्यमातून संघात समाविष्ट केलं. त्याचवेळी अष्टपैलू कॅमेरुन ग्रीनला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला ट्रेडऑफमध्ये देत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. ज्या कर्णधाराच्या नेतृत्वात संघबांधणी झाली, जेतेपद पटकावलं तो कर्णधारच गमावल्याने गुजरात टायटन्ससाठी हा मोठा धक्का होता पण हार्दिकच्या निर्णयाचा आदर करतो असं संघव्यवस्थापनाने म्हटलं. दुसरीकडे हार्दिकसाठी मुंबई इंडियन्स संघात परतणं माहेरी आल्यासारखंच होतं. कारण याच संघाच्या माध्यमातून त्याचा आयपीएल प्रवास सुरू झाला होता. सुरुवातीच्या काळात १० लाख रुपये मानधन मिळणाऱ्या हार्दिकला आता प्रति हंगाम १५ कोटी रुपये मिळणार असल्याचं स्पष्ट झालं.
मुंबई इंडियन्सकडून कर्णधार म्हणून घोषणा
आयपीएल हंगाम सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्स संघाने हार्दिक पंड्याची कर्णधारपदी नियुक्ती केली. रोहित शर्माने मुंबई इंडियन्स संघाला पाच जेतेपदं मिळवून दिली आहेत पण वय, दुखापती आणि भारतीय संघाचं कर्णधारपद हे लक्षात घेऊन हार्दिकला कर्णधार म्हणून नेमण्यात आलं. हार्दिकच्या गुजरात टायटन्सचा कर्णधार म्हणून कामगिरीची मुंबई इंडियन्सने दखल घेतली.मुंबई इंडियन्स संघाने सोशल मीडिया पोस्टद्वारे या मोठ्या निर्णयाची घोषणा केली.
सोशल मीडियावर आणि मैदानातही प्रचंड ट्रोलिंग
हार्दिक मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून घोषणा होताच प्रचंड ट्रोलिंगला सुरुवात झाली. रोहित शर्मा हा चाहत्यांचा अतिशय लाडका खेळाडू. मुंबईकर रोहितनेच मुंबई इंडियन्स संघाला पाच जेतेपदं मिळवून दिली. २००८ ते २०१२ या काळात मुंबई इंडियन्स संघाला जेतेपद पटकावता आलं नाही. रोहितने नेतृत्वाची धुरा हाती घेतल्यापासून मुंबईचं नशीब पालटलं. रोहितला अशा पद्धतीने कर्णधारपदावरून बाजूला केल्यामुळे चाहते भडकले. फेसबुक, एक्स, इन्स्टाग्राम सगळीकडे हार्दिकला लक्ष्य करण्यात आलं. त्याच्या वैयक्तिक आयुष्यावरही टीका करण्यात आली. त्याला उद्देशून आक्षेपार्ह शेरेबाजीही करण्यात आली. हार्दिकने या सगळ्याला उत्तर दिलं नाही.
आयपीएल सुरू झाल्यावर मैदानातही ट्रोलिंग
आयपीएलचा हंगाम सुरू झाल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या प्रत्येक सामन्यात हार्दिकला चाहत्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. मुंबईतल्या वानखेडे मैदानावर हार्दिकला उद्देशून टीका, शेरेबाजी करण्यात आली. वानखेडेवर झालेल्या एका लढतीत नाणेफेकेवेळी नीट वागा असं समालोचक संजय मांजरेकर यांना सांगावं लागलं कारण त्यांनी हार्दिकचं नाव घेताच हुर्यो उडवण्यात आली.
रोहित-हार्दिक बेबनाव असल्याच्या चर्चा
मावळता कर्णधार रोहित शर्मा आणि नवा कर्णधार हार्दिक पंड्या यांच्यात बेबनाव असल्याच्या अफवा पसरवण्यात आल्या. हार्दिक जाणीवपूर्वक रोहितला मैदानात दूरवर क्षेत्ररक्षणासाठी उभं करतो अशी टीकाही झाली. मुंबई इंडियन्स संघातील खेळाडू सल्ल्यासाठी रोहित शर्माकडे जातात, हार्दिकचा कर्णधार म्हणून त्यांनी स्वीकार केलेला नाही असंही दिसलं. गुजरातच्या हार्दिकमुळे मुंबईकर रोहितवर अन्याय झाला अशीही टीका झाली. हार्दिकच्या प्रत्येक कृतीवर झोड उठवण्यात आली. तो मात्र शांत राहिला.
मुंबई इंडियन्सची यथातथा कामगिरी, प्राथमिक फेरीतून गाशा गुंडाळला
या सगळ्यात मुंबई इंडियन्सची कामगिरी सर्वसाधारण राहिली आणि त्यांना प्राथमिक फेरीतूनच गाशा गुंडाळावा लागला. हार्दिकचं नेतृत्व मुंबईसाठी पहिल्या हंगामात तरी फलदायी ठरलं नाही. जेतेपदाचा दावेदार असणाऱ्या संघाची अशी कामगिरी झाल्याने चाहतेही नाराज झाले. १४पैकी फक्त ४ सामन्यात विजयासह मुंबई इंडियन्स संघ गुणतालिकेत तळाशी राहिला.
टी२० वर्ल्डकप संघात निवड, अष्टपैलू योगदान
दुखापतीतून पूर्णपणे सावरल्याने हार्दिकची टी२० वर्ल्डकप संघात निवड करण्यात आली. हार्दिकच्या समावेशामुळे संघाला संतुलन मिळालं. त्याने ८ सामन्यात १५१च्या स्ट्राईकरेटने १४४ धावा केल्या. यामध्ये एका अर्धशतकाचाही समावेश आहे. याबरोबरीने हार्दिकने ११ विकेट्सही पटकावल्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या फायनलमध्ये हार्दिकनेच शेवटचं षटक टाकलं. या षटकात हार्दिकने डेव्हिड मिलरला बाद करत सामन्याचं पारडं भारताच्या दिशेने झुकवलं. त्याआधी टाकलेल्या षटकातही हार्दिकने टिच्चून मारा करत दक्षिण आफ्रिकेला वरचढ होऊ दिलं नाही.
जिंकल्यानंतर भावुक
भारताने वर्ल्डकप जिंकताच हार्दिक ओक्साबोक्शी रडू लागला. जवळपास अर्धा ते पाऊण तास हार्दिक अत्यंत भावुक असल्याचं सगळ्यांनीच पाहिलं. गेल्या सहा महिन्यात माझ्या आयुष्यात बरंच काही झालं. माझ्यावर अन्याय झाला पण मी कशालाही उत्तर दिलं नाही. माझ्या कामगिरीनेच त्यांना उत्तर दिलं असं हार्दिकने विजयानंतर बोलताना सांगितलं.
घटस्फोटाच्या चर्चा
आयपीएल हंगामापासून हार्दिक आणि पत्नी नताशा यांच्यात सारं काही आलबेल नसल्याच्या बातम्या समोर येत होत्या. नताशाने सोशल मीडिया पोस्टद्वारे काही गोष्टी सूचित केल्या होत्या. मात्र औपचारिक पातळीवर दोघींनीही कोणतीही घोषणा केली नाही.
भाऊ कृणालची भावुक पोस्ट
गेल्या सहा महिन्यात तुला प्रचंड रोषाला सामोरं जावं लागलं. तुझ्या वैयक्तिक आयुष्यावर, जीवनशैलीवर टीका झाली. तुझ्यासाठी हा अत्यंत खडतर काळ होता पण तू खंबीरपणे उभा राहिलास. तुझ्या कामगिरीने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलंस. दुसरा कोणी असता तर उन्मळून पडला असता पण तू किती कणखर आहेस हे दाखवून दिलंस अशा शब्दात हार्दिकचा भाऊ आणि क्रिकेटपटू कृणाल पंड्याने पोस्ट लिहिली.
वानखेडेवर सत्कारादरम्यान रोहितनं केलं कौतुक, ‘हार्दिक हार्दिक’च्या घोषणा
भारतीय संघ मायदेशी दाखल होताच त्यांनी दिल्लीत पंतप्रधानांची भेट घेतली. त्यानंतर संघ मुंबईत आला. तिथे त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. लाखो चाहते यावेळी संघाला अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते. खेळाडूंचा वानखेडे स्टेडियममध्ये सत्कार करण्यात आला. यावेळी कर्णधार रोहित शर्माने हार्दिकचं कौतुक केलं. यावेळी मैदानात हार्दिक हार्दिक असा जयघोष झाला. ज्या मैदानावर हुर्यो उडवण्यात आली तिथेच हार्दिकचं कौतुक झालं. हार्दिकने सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांचे मनापासून आभार मानले. तुमच्या प्रेमामुळेच ही कामगिरी करू शकलो असं हार्दिकने लिहिलं.
बडोद्यात भव्य मिरवणूक आणि सत्कार
हार्दिक जिथे लहानाचा मोठा झाला त्या बडोदा शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. आपल्या लाडक्या हिरोला भेटण्यासाठी बडोदावासीय प्रचंड संख्येने उपस्थित होते. हार्दिकने जमलेल्या चाहत्यांचे आभार मानत असाच पाठिंबा देत राहा असं आवाहनही केलं.
कर्णधारपदासाठी विचार नाही, उपकर्णधारपदावरून बाजूला केलं
गुरुवारी श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड झाली. रोहित शर्माने टी२० वर्ल्डकपनंतर निवृत्ती जाहीर केली होती. रोहितनंतर कर्णधारपदाची जबाबदारी हार्दिकला मिळणार अशी चर्चा होती. मात्र निवडसमितीने टी२० प्रकारासाठी सूर्यकुमार यादवची कर्णधार म्हणून निवड केली. हार्दिक टी२० संघाचा भाग आहे. टी२० आणि वनडे दोन्ही संघांच्या उपकर्णधारपदावरून हार्दिकला बाजूला करण्यात आलं. शुबमन गिल दोन्ही प्रकारात उपकर्णधार असणार आहे.
घटस्फोटाची घोषणा
काही तासातच हार्दिकने सोशल मीडिया पोस्टद्वारे घटस्फोटाची घोषणा केली. हार्दिकने पोस्टमध्ये लिहिले की, “चार वर्षे एकत्र राहिल्यानंतर अखेरीस मी आणि नताशाने या नात्याला विराम देण्याचे ठरवले आहे. एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेण्याआधी आम्ही हे नाते वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला पण आता आम्हाला वाटतेय की हा निर्णय आमच्या दोघांच्या हिताचा आहे. आमच्या कुटुंबात आम्ही एकत्र अनुभवलेला आनंद व एकमेकांबद्दलचा आदर कायम स्मरणात असेल त्यामुळेच हा निर्णय घेणे कठीण होते. आम्हाला अगस्त्यच्या रूपात आशीर्वादच मिळाला आहे, त्यामुळे त्याचे हित हे आम्हा दोघांच्या आयुष्यात केंद्रस्थानी असेल. त्याच्या आनंदासाठी आम्ही पालक म्हणून जे काही करू शकतो ते सर्व करू. या कठीण व संवेदनशील वेळी आमच्या खाजगी गोष्टींबाबत तुम्ही संवेदनशील राहाल ही विनंती. तुमचं प्रेम, पाठिंबा आमच्या पाठीशी असेल अशी अपेक्षा करतो.