क्रिकेटपटू हार्दिक पंड्याच्या सावत्र भावाला बुधवारी कृणाल आणि हार्दिक या दोन्ही भावांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. वैभव पंड्या त्याच्याच सावत्र भावांची ४.३ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोषी आढळला आहे. वैभवसोबत हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या यांची एका व्यवसायात भागीदारी होती. ज्यामध्ये हार्दिक आणि कृणाल यांचा प्रत्येकी ४० टक्के तर वैभवचा २० टक्के वाटा होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वैभववर फसवणूक आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याचा आरोप आहे. २०२१ मध्ये तिघांनी मिळून पॉलिमर व्यवसाय सुरू केला. भागीदारीच्या अटी अशा होत्या की क्रिकेटपटू आणि त्याचा भाऊ प्रत्येकी ४० टक्के भांडवल देतील. तर सावत्र भाऊ २० टक्के भाग देईल आणि फर्म चालवण्याची संपूर्ण जबाबदारी स्वीकारेल. व्यवसायातून मिळणारा नफाही त्याच प्रमाणात वाटून घ्यायचा होता. हा नफा प्रत्येक व्यक्तीच्या या व्यवसायातील सहभागानुसार वाटून घ्यायचा होता. मात्र वैभवने तसे केले नाही. कंपनीचा नफा आपल्या भावांना देण्याऐवजी वैभवने वेगळी कंपनी स्थापन करून ती त्याच्याकडे हस्तांतरित करून व्यवसायाच्या भागीदारी कराराचे उल्लंघन केले.

हार्दिक आणि कृणालचे यामुळे ४.३ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सावत्र भावाने अटींचे उल्लंघन केले आणि क्रिकेटपटू आणि त्याच्या भावाला न सांगता त्याच व्यवसायात दुसरी फर्म सुरू केली. टाईम्स ऑफ इंडियामध्ये दिलेल्या वृत्तानुसार एका सूत्राने सांगितले- यामुळे मुख्य कंपनीचे ३ कोटी रुपयांचे नुकसान झाले. सावत्र भावाने कोणालाही न कळवता त्याचा नफा २० टक्के वरून ३३.३टक्क्यांपर्यंत वाढवला, ज्यामुळे क्रिकेटर आणि त्याच्या भावाचे नुकसान झाले. सावत्र भावाने भागीदारी असलेल्या फर्मच्या खात्यातून लाखो रुपये स्वतःच्या खात्यात वळवून एक कोटी रुपये काढून घेतल्याचा आरोप आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hardik pandya stepbrother vaibhav pandya arrested for duping cricketers for 4 3 crore bdg