IND vs ENG 3rd T20I Hardik Pandya Angry Video: इंग्लंडने तिसऱ्या टी-२० सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर भारताचा २६ धावांनी पराभव करत मालिकेत पुनरागमन केलं. भारताची संपूर्ण फलंदाजी फळी या सामन्यात अपयशी ठरली. पण हार्दिक पांड्याने भारतासाठी ४० धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. मात्र, तो टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाल्यानंतर पंड्या चांगलाच संतापलेला दिसला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हार्दिक पंड्याने आजवर भारतासाठी एकापेक्षा एक उत्कृष्ट खेळी केल्या आहेत. त्यामुळे हार्दिक मैदानावर आहे तोपर्यंत भारताच्या विजयाची शक्यता होती. हार्दिक पंड्याही आपल्या फटकेबाजीने भारतीय चाहत्यांच्या आशा उंचावत होता. पण तो ४० धावा केल्यानंतर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात जेमी ओव्हरटनच्या १९व्या षटकात सीमारेषेजवळ झेलबाद झाला. संघाला गरज असताना झेलबाद झाल्याने हार्दिक चांगलाच संतापला आणि स्वत:वरच राग काढताना दिसला. बाद झाल्यानंतर हार्दिकने बॅटही मैदानात भिरकवली. ज्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.

राजकोटमध्ये झालेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताच्या फलंदाजांनी निराशा केली. भारतीय संघ २० षटकांत ९ विकेट गमावून केवळ १४५ धावा करू शकला आणि २६ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. इंग्लंडच्या गोलंदाजीपुढे भारताला टी-२० सामन्यात ४३ चेंडूमध्ये एकही चौकार किंवा षटकार लगावता आला नव्हता.

सलामीवीर संजू सॅमसन ३ धावा करून बाद झाला. कर्णधार सूर्यकुमार यादव १४ धावा करून बाद झाला. तर तिलक वर्मा १८ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. अभिषेक शर्माने १४ चेंडूंचा सामना करत २४ धावा केल्या. पंड्याने ४० आणि अक्षर पटेलने १५ धावांची खेळी केली. पण भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये फलंदाज म्हणून संधी मिळालेला ध्रुव जुरेल सामन्यात आठव्या क्रमांकावर फलंदाजीलाठी उतरला. संघात स्पेशालिस्ट फलंदाज असतानाही त्याला मधल्या फळीत फलंदाजीसाठी मैदानात न पाठवल्याने टीका केली जात आहे.

भारताने पहिले दोन्ही सामने जिंकले आहेत. कोलकाता येथे झालेल्या सामन्यात टीम इंडियाने ७ विकेट्सने विजय मिळवला होता. यानंतर चेन्नईने २ गडी राखून विजय मिळवला. मात्र तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने पुनरागमन करत सामन्यात विजय नोंदवला आणि मालिकेतील आपले आव्हान कायम राखले. सध्या मालिकेत भारत आघाडीवर असला तरी इंग्लंडने २-१ च्या फरकाने आपले खाते उघडले आहे. आता या मालिकेतील चौथा सामना ३१ जानेवारीला पुण्यात होणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hardik pandya throws bat curses himself after his wicket in ind vs eng 3rd t20i video viral bdg