नुकताच इंडियन प्रीमियर लीगचा १५वा हंगाम पार पडला. आपला पहिलाच हंगाम खेळणाऱ्या गुजरात टायटन्सच्या संघाने सुरुवातीपासून शानदार खेळ करत विजेतेपद पटकावले. गुजरात टायटन्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी भारतीय संघातील आक्रमक अष्टपैलू खेळाडू असलेल्या हार्दिक पंड्याकडे होती. प्रथमच कर्णधारपदाची जबाबदारी अंगावर पडलेल्या पंड्याने संपूर्ण हंगामात अप्रतिम कामगिरी करत संघाला विजेतेपद मिळवून दिले. नुकतीच बीसीसीआय टीव्हीसोबत बोलताना त्याने आपल्या भविष्यातील योजना आणि ध्येयांबाबत माहिती दिली.
हार्दिक पंड्या इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच चांगल्या फॉर्ममध्ये होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या पहिल्या टी ट्वेंटी सामन्यातही त्याने आपला हाच फॉर्म कामय ठेवला. दिल्लीतील अरुण जेटेली स्टेडियमवर झालेल्या पहिल्या टी ट्वेंटी सामन्यात पंड्याने १२ चेंडूत ३१ धावा करून भारतीय संघाला २००धावांचा टप्पा पार करून दिला. मात्र, आयपीएल विजेतेपद किंवा एखादी मालिका जिंकणे हे आपले ध्येय नसल्याचे त्याने म्हटले आहे. ‘भारतीय संघासाठी विश्वचषक जिंकणे हे आपले मुख्य आणि सर्वात मोठे ध्येय आहे,’ असे पंड्या म्हणाला.
बीसीसीआय टीव्हीसोबत बोलताना हार्दिक म्हणाला, “भारतासाठी विश्वचषक जिंकणे हे माझे मुख्य ध्येय आहे. देशासाठी चांगली कामगिरी करणेदेखील माझ्यासाठी महत्वाचे आहे. मी त्यासाठी सतत उत्सुक आहे. देशासाठी खेळण्याची भावना नेहमीच माझ्यासाठी खास राहिली आहे. आयपीएलपूर्वी प्रदीर्घ विश्रांती घेऊन पुन्हा पुनरागमन केल्यानंतर, मी नेमकी कशासाठी मेहनत केली आहे हे दाखवण्याची संधी मला मिळाली आहे.”
हेही वाचा – ‘हा’ दिग्गज भारतीय फिरकीपटू खेळतोय क्लब क्रिकेट! जाणून घ्या कारण
तो पुढेही असेही म्हणाला, “तुम्ही खेळत असलेला प्रत्येक सामना तुमच्या शेवटच्या सामन्याइतकाच महत्त्वाचा असतो. विश्वचषक जिंकणे हे माझे मुख्य ध्येय आहे. त्याच्या तयारीसाठी सध्या सुरू असलेल्या मालिका महत्त्वाच्या आहेत. पुन्हा एकदा क्रिकेट पूर्ण जोमात सुरू झाले आहे. त्यामुळे सतत फॉर्ममध्ये राहणे गरजेचे आहे. कदाचित भविष्यात माझ्या भूमिका आणि जबाबदाऱ्याही बदलल्या जातील.”
दरम्यान, भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानचा दुसरा टी ट्वेंटी सामना रविवारी (१२ जून) ओडिशातील कटकमध्ये खेळवला जाणार आहे. त्यासाठी दोन्ही संघ तिथे दाखल झाले असून त्यांनी सरावाला सुरुवात केली आहे.