टी २० वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून पराभव झाल्यानंतर भारताच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी भारताला न्यूझीलंडला पराभूत करणं आवश्यक आहे. त्यामुळे भारतीय संघ कसून सराव करत आहे. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात हार्दिक पंड्याने गोलंदाजी केली नव्हती. त्यामुळे त्याच्याऐवजी इतर खेळाडूला संधी देण्याची मागणी जोर धरत आहे. अशातच हार्दिक पंड्या नेटमध्ये घाम गाळताना दिसला. विशेष म्हणजे हार्दिकने नेटमध्ये गोलंदाजीचा सराव केला.
हार्दिक पंड्याने टीम फिजिओ नितीन पटेल आणि सहाय्यक प्रशिक्षक सोहम देसाई यांच्या नेतृत्वाखाली सराव केला. जवळपास २० मिनिटे स्ट्रेचिंगपासून स्प्रिटिंगपर्यंत सराव केला. त्यानंतर नेटमध्ये जाऊन गोलंदाजी केली, तसेच भुवनेश्वर कुमार आणि शार्दुल ठाकुरने फलंदाजी केली. कर्णधार विराट कोहली, मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री आणि मार्गदर्शक एमएस धोनीनं त्यांच्या खेळाची चाचपणी केली. हार्दिक पंड्या नेटमध्ये गोलंदाजी करत असल्याचं समोर येताच माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणने आनंद व्यक्त केला आहे. “पंड्याने सामन्यात दोन षटकं जरी टाकली तरी संघाला फायदा होईल. पाकिस्तान विरुद्ध पाच गोलंदाजांनी गोलंदाजी केली. भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी यांची षटकं महागडी ठरली. मात्र त्यानंतरही त्यांच्याकडून गोलंदाजी करावी लागली होती.”, असं लक्ष्मणने सांगितलं. विशेष म्हणजे हार्दिक पंड्याने आयपीएल २०२१ स्पर्धेत गोलंदाजी केली नव्हती.
पंड्याच्या गोलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर निवडकर्त्यांनी अक्षर पटेलच्या जागी शार्दुल ठाकुरचा संघात समावेश केला आहे. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात कोहलीने पंड्याला पॉवर हिटर संघात स्थान दिलं होतं. तसेच सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवलं होतं. सामन्यादरम्यान उजव्या खांद्याला मार लागला आणि स्कॅन केल्यानंतर काहीही गंभीर नसल्याचं समोर आलं आहे. सहाव्या गोलंदाजाचा पर्याय नसल्याने भारतीय गोटात सध्या चिंतेचं वातावरण आहे. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात १० विकेट्सने पराभव झाल्याने हे उघड झालं आहे.