India vs Sri Lanka ICC Cricket World Cup 2023 Match Updates: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात दुखापतीमुळे बाहेर पडला होता. त्यानंतर तो न्यूझीलंड आणि इंग्लंडविरुद्ध खेळू शकला नाही. आता श्रीलंका किंवा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पुनरागमन करेल, अशी अटकळ बांधली जात होती. पण आता पुन्हा एकदा चाहत्यांसाठी एक चांगली आणि एक वाईट बातमी समोर आली आहे. ताज्या अपडेटनुसार, हार्दिक पांड्या किमान पुढील दोन सामन्यांतून बाहेर होणार आहे.
हार्दिक पांड्या कधी परतणार संघात?
चांगल्या बातमीबद्दल बोलायचे तर, रिपोर्ट्सनुसार, हार्दिक पांड्या उपांत्य फेरीपूर्वी म्हणजेच बाद फेरीपूर्वी टीम इंडियात सामील होईल. भारतीय संघ २ नोव्हेंबरला श्रीलंकेशी आणि त्यानंतर ५ नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेशी भिडणार आहे. संघाचा शेवटचा साखळी सामना १२ नोव्हेंबर रोजी नेदरलँड्सविरुद्ध होणार आहे. आता हार्दिक नेदरलँड्सविरुद्ध पुनरागमन करणार की भारतीय उपकर्णधार थेट उपांत्य फेरीतच मैदानात उतरणार हे पाहायचे आहे. मात्र आता उपांत्य फेरीत त्याचे पुनरागमन होणार हे निश्चित मानले जात आहे.
हार्दिक पांड्याबद्दल सांगायचे तर बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात फॉलो थ्रूमध्ये चेंडू रोखताना त्याचा पाय मुरगळल्याने तो जखमी झाला होता. तेव्हा पासून हार्दिक पांड्या संघातून बाहेर आहे. जोपर्यंत हार्दिक तंदुरुस्त होत नाही तोपर्यंत त्याला एनसीएमधील वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली ठेवण्यात येईल, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले होते. मात्र, गरज पडल्यास हार्दिक इंजेक्शन घेऊन खेळू शकतो, असे बोलले जात होते. मात्र आता हार्दिक तंदुरुस्त झाल्यानंतरच मैदानात उतरणार असल्याचे दिसत आहे.
सूर्या-शमीला मिळाली संधी –
हार्दिक पांड्याच्या दुखापतीनंतर सूर्यकुमार यादव आणि मोहम्मद शमी यांचा संघात समावेश करण्यात आला होता. न्यूझीलंडविरुद्ध सूर्या २ धावांवर धावबाद झाला. पण इंग्लंडविरुद्ध त्याने ४९ धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. दुसरीकडे, शमीने दोन सामन्यांत ९ विकेट घेतल्या आहेत. त्याने न्यूझीलंडविरुद्ध पाच आणि इंग्लंडविरुद्ध चार बळी घेतले. याचा अर्थ आता हार्दिकच्या पुनरागमनानंतर या दोघांनी चांगली कामगिरी करत राहिल्यास या खेळाडूंना वगळणे कठीण होईल.