भारताचा उदयोनमुख खेळाडू हार्दिक पांड्या आणि श्रीलंकेचा जलदगती गोलंदाज लसिथ मलिंगाला त्याच्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिलेल्या आहेत. सोमवारी लसिथ मलिंगाने आपला ३४ वा वाढदिवस साजरा केला. यावेळी हार्दिक पांड्याने आपल्या ट्विटर अकाऊंटवर दोघांचा फोटो शेअर करत, मलिंगाला खास संदेश देत शुभेच्छा दिल्या.

लसिथ मलिंगा आणि हार्दिक पांड्या हे आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स या एकाच संघाकडून खेळतात. आतापर्यंत मलिंगाने आयपीएलच्या ११० सामन्यांमध्ये १५४ बळी घेतले आहेत. हार्दिक पांड्याला सध्या श्रीलंकेत सुरु असलेल्या वन-डे मालिकेत आपला ठसा उमटवता आलेला नाहीये. याचप्रमाणे मलिंगालाही आतापर्यंत ३ सामन्यांमध्ये अवघा एक बळी मिळवता आला आहे. वन-डे आणि टी-२० सामन्यांमध्ये आतापर्यंत मलिंगाने अनुक्रमे २९९ आणि ८९ बळी घेतले आहेत.

यासोबत अनेक माजी क्रिकेटपटूंनी मलिंगाला त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे आगामी सामन्यांमध्ये मलिंगा आपल्या जुन्या फॉर्ममध्ये परतून लंकेला सामने जिंकवून देऊ शकतो का हे पहावं लागणार आहे.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने कसोटी मालिकेपाठोपाठ वन-डे मालिकेतही ३-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे उरलेल्या २ सामन्यांमध्ये श्रीलंकेचा संघ कशी कामगिरी करतोय याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. या मालिकेतला चौथा सामना गुरुवारी कोलंबोच्या आर.प्रेमदास स्टेडीयममध्ये खेळवण्यात येणार आहे.

Story img Loader