‘कॉफी विथ करण’ कार्यक्रमात महिलांविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे भारतीय संघाला अष्टपैलू हार्दिक पांड्या चांगलाच अडचणीत आला आहे. बीसीसीआयच्या क्रिकेट प्रशासकीय समितीने हार्दिक आणि त्याचा सहकारी लोकेश राहुलवर दोन वन-डे सामन्यांच्या बंदीची शिक्षा सुनावली आहे. मात्र हार्दिक पांड्याचे वडील हिमांशू पांड्या हे आपल्या मुलाच्या समर्थनासाठी धावून आले आहेत. मिड-डे वृत्तपत्राशी बोलताना हिमांशू पांड्यांनी हार्दिकची पाठराखण केली.

“हार्दिकने केलेल्या वक्तव्याचा लोकांनी जास्त विचार करण्याची गरज नाही. तो एक मनोरंजनात्मक कार्यक्रम होता, आणि तिकडे हार्दिकने केलेलं वक्तव्य हे गमतीत केलं होतं. प्रेक्षकांचं मनोरंजन हा एकमेव हेतू त्यामागे होता. त्यामुळे त्याचं वक्तव्य गांभीर्याने घेण्याची गरज नाही. हार्दिक खरंच भोळा आहे.” हिमांशू पांड्यांनी आपल्या मुलाची बाजू मांडली.

कसोटी मालिकेत 2-1 ने बाजी मारल्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात शनिवारपासून 3 वन-डे सामन्यांची मालिका सुरु होते आहे. हार्दिक आणि लोकेश राहुल या दोन्ही खेळाडूंनी वन-डे संघामध्ये निवड झाली आहे. मात्र कॉफी विथ करण कार्यक्रमात केलेलं वक्तव्य आणि त्यानंतर प्रशासकीय समितीने केलेली 2 सामन्यांच्या बंदीची शिफारस यामुळे हार्दिक आणि राहुलला संघात स्थान मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.