पाटीदार अनामत आंदोलन समितीचा नेता हार्दिक पटेलने आगामी एकदिवसीय क्रिकेट सामन्याच्या वेळी भारत व दक्षिण आफ्रिका या संघांच्या गाडय़ा अडवण्याची धमकी दिली आहे. हा सामना १८ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
खेळाडूंचे वास्तव्य असलेली हॉटेल्स ते स्टेडियम या मार्गात आंदोलन करीत त्यांना खंडेरी गावात असलेल्या सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर जाण्यास रोखले जाईल, असे हार्दिक याने जाहीर केले आहे. तो म्हणाला, ‘‘आमच्या समाजाच्या प्रेक्षकांनी सामन्याच्या वेळी घोषणा करू नये, यासाठी आमच्या समाजातील प्रेक्षकांना तिकिटे देण्यापासून वंचित ठेवले जात आहे.’’
हार्दिकने दिलेली धमकी लक्षात घेऊन पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था सुरू केली आहे. स्टेडियमवर प्रवेश करणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाची कसून तपासणी केली जाणार आहे. तसेच स्टेडियमच्या गॅलरीतही भरपूर पोलीस तैनात केले जाणार आहेत. तसेच शीघ्र कृती दलाचीही मदत घेतली जात आहे. अनेक ठिकाणी सीसी कॅमेरे ठेवले जाणार आहेत. या सामन्यासाठी दोन्ही संघांचे येथे गुरुवारी आगमन झाले असून दोन्ही संघ शनिवारी सराव करणार आहेत. अनेक तिकिटे शिल्लक असूनही सौराष्ट्र क्रिकेट संघटनेने सामन्याची तिकिटे संपल्याचे जाहीर केले आहे, असा आरोप हार्दिकने केला आहे.