U-19 Asia Cup, India vs Pakistan, Arshin Kulkarni: टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या बांगलादेशविरुद्धच्या विश्वचषक सामन्यात गोलंदाजी करताना दुखापतग्रस्त झाला आणि त्यानंतर संघ व्यवस्थापनाने त्याला वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली बंगळुरूला पाठवले. वैद्यकीय पथकाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात असे समोर आले आहे की, हार्दिक पंड्याला ‘लिगामेंट टियर १’ दुखापत झाली आहे आणि तो येत्या काही दिवसांत टीम इंडियामध्ये सहभागी होऊ शकतो. मात्र, असे काहीही झाले नाही आणि नुकत्याच आलेल्या अहवालामध्ये असा दावा करण्यात आला आहे की, “हार्दिक पंड्या जवळपास १८ आठवडे क्रिकेटपासून दूर राहणार आहे.”
हार्दिकची ही दुखापत लक्षात घेता बीसीसीआयच्या व्यवस्थापनाने आता हार्दिक पंड्याच्या बदलीचा विचार सुरू केला असून, अजित आगरकरने अलीकडेच देशांतर्गत आणि वयोगटातील स्पर्धांमध्ये आपल्या संघासाठी चांगली कामगिरी केलेल्या खेळाडूची निवड केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचा अर्शीन कुलकर्णी अव्वलस्थानी आहे. सध्या १९ वर्षाखालील आशिया चषक स्पर्धेत तो खेळत आहे. त्यात त्याने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात शानदार कामगिरी केली. त्यामुळे त्याला टीम इंडियातील पुढचा हार्दिक पंड्या म्हटले जात आहे.
अर्शीन कुलकर्णी हार्दिक पंड्याची जागा घेऊ शकतो
जर आपण टीम इंडियाचा सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याच्या बदलीबद्दल बोललो तर व्यवस्थापन त्याच्या जागी एखाद्या खेळाडूची निवड करू शकते ज्याने अलीकडच्या काळात संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. सूत्रांद्वारे हे उघड झाले आहे की बीसीसीआयचे व्यवस्थापन टीम इंडियामध्ये हार्दिकच्या जागी १९ वर्षांखालील उदयोन्मुख प्रतिभावान युवा खेळाडू अर्शीन कुलकर्णीची कायमची निवड करू शकते. अर्शीन कुलकर्णीने अलीकडेच अंडर-१९ आशिया चषक स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात चांगली कामगिरी केली आहे.
अर्शीन कुलकर्णीने आशिया चषकात चमकदार कामगिरी केली
उदयोन्मुख अष्टपैलू अर्शीन कुलकर्णीच्या सध्याच्या कामगिरीबद्दल जर बोलायचे झाले तर, त्याने अलीकडेच टीम इंडियासाठी चमकदार कामगिरी केली आहे. अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात गोलंदाजी करताना अर्शीन कुलकर्णीने ८ षटकात २९ धावा देत ३ महत्त्वाचे विकेट्स घेतल्या. जर त्याच्या फलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर अर्शीन कुलकर्णीने १०५ चेंडूंचा सामना केला आणि ४ चौकारांच्या मदतीने ७० धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. अर्शीन कुलकर्णीच्या या खेळीमुळेच त्याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अर्शीन कुलकर्णीची कामगिरी
अंडर-१९ आशिया चषक स्पर्धेत भारताचा दुसरा सामना पाकिस्तानशी होत आहे. दुबईतील आयसीसी अकादमीत प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने चांगली सुरुवात केली आहे. १४ षटकांनंतर भारताची धावसंख्या ५१/२ होती. अर्शीन कुलकर्णी २४ धावा करून बाद झाला. पाकिस्तानचा कर्णधार साद बेगने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.