‘‘बुद्धिबळात काही वेळा दडपणाखाली झालेली एखादी चूकही खूप महागात पडते. माझ्याबाबतही तसेच झाले. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील उपांत्य फेरीत मला चीनच्या तान झोंगयीविरुद्ध बरोबरीची कोंडी फोडणाऱ्या लढतीमध्ये पराभव स्वीकारावा लागला. मला जरी कांस्यपदक मिळाले असले तरी या पराभवाचे शल्य मला नेहमीच जाणवणार आहे,’’ असे अर्जुन पुरस्कार विजेत्या द्रोणावली हरिकाने सांगितले.

तेहरान येथे झालेल्या महिलांच्या जागतिक स्पर्धेतील उपांत्य फेरीत झोंगयीकडून हरिकाला अर्मागेडन डावात पराभव स्वीकारावा लागला होता. झोंगयीविरुद्ध पहिला डाव जिंकल्यानंतर तिची बाजू बळकट झाली होती, मात्र दुसरा डाव जिंकून झोंगयीने आव्हान राखले. पाठोपाठ टायब्रेकरमध्ये तिने हरिकाचे आव्हान संपुष्टात आणले. उपांत्य फेरीत पराभूत झाल्यामुळे हरिकाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

‘‘या स्पर्धेत पदक मिळवण्याची मला खात्री होती तरीही अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठीच मी खूप मेहनत केली होती. परंतु झोंगयीविरुद्धच्या लढतीमध्ये वेळेच्या दडपणाखाली चाली करताना माझ्याकडून नकळत चूक झाली व या चुकीमुळेच झोंगयी हिला विजय मिळविता आला,’’ असे हरिकाने सांगितले.

ती पुढे म्हणाली, ‘‘आमच्या खेळात काही वेळा अशा चुका होणे अपेक्षित असते. मात्र त्यामुळे अंतिम फेरीची संधी हुकल्याचे दु:ख खूप मोठे आहे. अर्थात, या अपयशामुळे मी खचून जाणारी खेळाडू नाही. उलट आपण कोठे कमी पडलो याचा अभ्यास मला करता आलेला आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या अन्य परदेशी खेळाडूंचा अव्वल दर्जा लक्षात घेता माझी कामगिरी चांगलीच झाली आहे. पुढच्या विश्वचषक स्पर्धेत सर्वोच्च यश मिळविण्याचे माझे ध्येय आहे.’’

‘‘तेहरानमध्ये शहराबाहेरील पंचतारांकित हॉटेलमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली होती. त्यामुळे प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद नव्हता. मात्र तेथील आदरातिथ्यामुळे मी खूप भारावून गेले. फावल्या वेळी शहरात हिंडताना काही भारतीय नागरिक भेटल्यावर मला खूप आनंद झाला. मी येथे बुद्धिबळ खेळण्यासाठी आले आहे हे त्यांना सांगितल्यानंतर त्यांना माझे खूप कौतुक वाटले,’’ असेही हरिकाने सांगितले.

परदेशी खेळाडूंबरोबर संवाद साधण्याची संधी मिळाली का, असे विचारले असता हरिका म्हणाली, ‘‘ही स्पर्धा अतिशय प्रतिष्ठेची असल्यामुळे प्रत्येक खेळाडू डाव संपल्यानंतर पुन्हा सरावाकडे वळत असे. तरीही मला काही परदेशी खेळाडूंबरोबर चर्चा करण्याची संधी मिळाली. त्यांच्याकडून मला काही बहुमोल सूचनाही मिळाल्या. त्याचा उपयोग मला भावी कारकीर्दीसाठी होणार आहे. चीनच्या खेळाडूंनी गेल्या काही वर्षांमध्ये लक्षणीय प्रगती केली आहे. रशियन खेळाडूंनीही त्यांचा धसका घेतला असल्याचे मला तेथे दिसून आले.’’

दिग्गज महिला बुद्धिबळपटू ज्युडिथ पोल्गर हिच्यासारखे जागतिक स्तरावर यश मिळवण्याचे २६ वर्षीय हरिकाचे ध्येय आहे. हे ध्येय साकारण्यासाठी घरच्यांकडून सतत प्रोत्साहन मिळत असते, असे हरिकाने सांगितले.