Harmanpreet Kaur Viral Video IND vs BAN: भारताच्या बांगलादेश दौऱ्यातील शेवटचा एकदिवसीय सामना खूप वादग्रस्त ठरला. फलंदाजीदरम्यान बाद झाल्यावर हरमनप्रीत कौर भडकली. अंपायरच्या चुकीच्या निर्णयावर संताप व्यक्त केला. त्यानंतर तिने सामन्याच्या शेवटी सुद्धा पंचांवर सडकून टीका केली. एरवी संघाच्या बाजूने भक्कम उभे राहणारे फॅन्स सुद्धा आता हरमनप्रीत कौरच्या वागण्याने नाराज झाले आहेत, इतकंच नव्हे तर ट्विटर पासून ते सर्वच सोशल मीडियावर हरमनप्रीत कौरला आयुष्यभरासाठी क्रिकेटमधून बॅन करा अशीही मागणी होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे दोन व्हिडीओ पाहून ही मागणी का होतेय याचा अंदाज येईल नेमका हा प्रकार काय चला पाहूया..
शेवटच्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार हरमनप्रीत कौर नाराज झाली होती. अंपायरने आऊट दिल्यानंतर हरमनप्रीतने बॅट स्टंपला आदळली. शिवाय मैदानातच बडबड करून तिने बांगलादेशच्या फॅन्सला ‘मधलं बोटं’ दाखवल्याचे सुद्धा म्हटले होत आहे. हरमनप्रीतने मात्र मी असं काही केलं नाही उलट मी बॅट हातात उचलून दाखवत होते असे सांगितले आहे. इतकंच नाही तर मॅचनंतर जेव्हा (टाय झाल्यामुळे दोन्ही संघांना) ट्रॉफी देण्यात आली तेव्हा सुद्धा हरमनने यांच्याबरोबर पंचांना सुद्धा बोलावून घ्या असा हट्ट धरला. यासगळ्यामुळे संतप्त बांगलादेशची कर्णधार संघाला घेऊन तिथून निघून गेली.
हरमनप्रीत कौरचे वादग्रस्त Video
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
दरम्यान, या सगळ्या प्रकरणानंतर आयसीसीने हरमनप्रीत कौरवर मॅचच्या फीच्या ७५ टक्के दंड ठोठावला आहे. यावर आपली बाजू मांडताना हरमनने मात्र पंचांवरच आगपाखड केली आहे. “पुढच्या वेळी बांगलादेशला येण्यापूर्वी संघालाही अशा अंपायरिंगला सामोरे जावे लागेल हे आम्ही लक्षात ठेवू आणि त्याची मानसिक तयारी करू.” असेही ती म्हणाली. दुसरीकडे काही चाहत्यांनी मात्र हरमनला पाठिंबा देत क्रिकेटमध्ये अनेकदा असे प्रकार घडले आहेत, विशेषतः पुरुषांच्या क्रिकेटमध्ये तर कित्येक खेळाडू सहज राग व्यक्त करतात त्यामुळे एका सामन्यावरून तिची परीक्षा करणे चुकीचे आहे असेही फॅन्स म्हणत आहेत.