भारत-विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताची गोलंदाज दिप्ती शर्माने इंग्लंडच्या फलंदाजाला अनोख्या पद्धतीने धावबाद केल्यामुळे वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. दिप्तीने इंग्लंडची फंलदाज शार्लोट डीनला धावबाद करून भारताला विजय मिळवून दिला. मात्र दिप्तीने धावबाद करण्यासाठी वापरलेली पद्धत म्हणजे मंकडिंग असून हे खेळभावनेविरोधी कृती असल्याचे मत काहींनी व्यक्त केले आहे. तर काहींनी दिप्तीला थेट पाठिंबा दिला असून तिने नियमांना धरूनच शार्लोट डीनला बाद केले, अशी भूमिका काहींनी घेतली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रित कौरने या सर्व वादावर प्रतिक्रिया दिली आहे. तिने दिप्तीला पाठिंबा दिला आहे.

हेही वाचा >> विश्लेषण : ‘मंकडिंग’ला अधिकृत अधिष्ठान; ‘एमसीसी’चे नवे नियम काय आहेत?

हरमनप्रित कौर काय म्हणाली?

हा खेळाचा एक भाग आहे. आम्ही वेगळे काही केले आहे, असे मला वाटत नाही. हा क्रिकेटमधील एक नियम आहे. दिप्तीने ज्या पद्धतीने इंग्लंडच्या खेळाडूला बाद केले, त्यातून तिची क्रिकेटच्या नियमांविषयीची जागरुकताच दिसते. काही लोकांसाठी हा वादाचा मुद्दा असू शकतो. मात्र मी दिप्तीला पाठिंबा देत आहे. तिने काहीही चुकीचे केलेले नाही. आम्ही सामना जिंकला असून आनंद साजरा करणार आहोत, असे हरमनप्रति कौर म्हणाली.

हेही वाचा >> Video : दिप्ती शर्माने घेतलेल्या बळीमुळे नवा वाद, इंग्लंडच्या खेळाडूला मैदानावरच कोसळलं रडू; सामन्यात नेमकं काय घडलं?

सामन्यात नेमकं काय घडलं?

भारताने विजयासाठी दिलेल्या १७० धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी इंग्लंडच्या संघाकडून पूर्ण ताकदीने प्रयत्न केले जात होते. इंग्लंडच्या १५३ धावा झाल्या होत्या. यावेळी मैदानात शार्लोट डीन आणि फ्रेया डेव्हिस ही जोडी फलंदाजी करत होती. इंग्लंड संघाकडून शार्लोट डीन ही एकटी किल्ला लढवत होती. तिने ८० चेंडूंमध्ये ४७ धावा केल्या. होत्या. मात्र ४३ व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर भारतीय गोलंदाज दिप्ती शर्माने क्रिकेटच्या नियमांचा पुरेपूर उपयोग करून घेतला. दिप्ती शर्माने चेंडू फेकण्याआधीच नॉन स्ट्राईकवर असलेल्या शार्लोट डीनने क्रीझ सोडले. हीच संधी साधत दिप्तीने शार्लोट डीनला धावबाद केले. याआधी फलंदाजाला अशा प्रकारे बाद करण्याला मंकडिंग म्हटले जायचे. विशेष म्हणजे मंकडिंग हे खेळभावनेविरोधी असल्याचा म्हटले जायचे. मात्र आता गोलंदाजाने फलंदाजाला अशा प्रकारे बाद केले, तर त्याला अधिकृतपणे धावबाद म्हणून बाद दिले जाते. याच बदललेल्या नियमांचा आधार घेत दिप्तीने शार्लोट डीनला धावबाद केले आणि सामन्यात विजय मिळवला.

हेही वाचा >> भारत-इंग्लंड एकदिवसीय मालिका : झुलनला निर्भेळ यशाची भेट!; तिसऱ्या सामन्यात भारतीय महिला संघाचा इंग्लंडवर १६ धावांनी विजय

दरम्यान, या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने सुरुवातीला फलंदाजी करत ४५.४ षटकांत १६९ धावा केल्या. ही धावसंख्या गाठण्याचा इंग्लंड महिला क्रिकेट संघाकडून पूर्ण ताकदीने प्रयत्न केला जात होता. मात्र इंग्लंडचा संघ ४३.३ षटाकांतच बाद झाला. इंग्लंडला अवघ्या १५३ धावा करता आल्या.

Story img Loader