Harmanpreet Kaur Creates History: जगभरातील अनेक क्रिकेटपटू आपल्या कारकिर्दीत नवनवीन टप्पे गाठत आहेत, पण महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने एक असा विक्रम केला आहे. ज्याचे स्वप्न जवळपास प्रत्येक क्रिकेटपटू पाहत असतो. टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरने महिला विश्वचषक स्पर्धेत भारत-आयर्लंड सामन्यात मैदानात उतरताच इतिहास रचला.
खरं तर, कर्णधार हरमनप्रीत कौर आयर्लंडविरुद्ध मैदानात उतरताच १५० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी जगातील पहिली क्रिकेटपटू ठरली. जगातील कोणताही क्रिकेटपटू (महिला किंवा पुरुष) आतापर्यंत हा आकडा गाठू शकलेला नाही. या खास क्षणावर कॅप्टन हरमनप्रीत भावूक झाली.
हरमनप्रीत म्हणाली, हे खूप महत्वपूर्ण आहे, मला माझ्या सहकाऱ्यांकडून भावनिक संदेश मिळाला आहे. यावेळी त्यांनी बीसीसीआय आणि आयसीसीचे आभार मानले. कर्णधार म्हणाली की बीसीसीआय आणि आयसीसीमुळे आम्ही इतके सामने खेळू शकलो.
रोहित शर्माने १४८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळलेत –
पुरुष क्रिकेटपटूबद्दल बोलायचे झाले, तर १४८ सामने खेळून रोहित शर्मा अव्वल स्थानावर आहे. तर विराट कोहली ११५ सामने खेळून सातव्या स्थानावर आहे. एमएस धोनीने त्याच्या कारकिर्दीत ९८ सामने खेळले. अशा प्रकारे हरमनप्रीत कौर या सर्व क्रिकेटपटूंच्या पुढे गेली आहे. दुसरीकडे, महिला क्रिकेटपटूंबद्दल बोलायचे झाले तर, हरमनप्रीत कौरनंतर न्यूझीलंडची फलंदाज सुझी बेट्स दुसऱ्या स्थानावर आहे. बेट्सने आपल्या कारकिर्दीत १४३ सामने खेळले आहेत. इंग्लंडची फलंदाज डेनी व्याट १४१ सामन्यांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
हेही वाचा – IND vs AUS Test Series: रोहित शर्माने रचला मोठा विक्रम; धोनी आणि बाबरच्या ‘या’ विक्रमाशी केली बरोबरी
सर्वाधिक धावा करणारी जगातील चौथी महिला क्रिकेटपटू –
या सामन्यात ती अवघ्या १३ धावा करून बाद झाली असली, तरी यासह तिने एका मोठ्या विक्रमाची नोंद केली. हरमनप्रीतने १५० टी-२० सामन्यांमध्ये ३००६ धावा केल्या आहेत. महिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारी ती जगातील चौथी क्रिकेटपटू ठरली. विशेष बाब म्हणजे महिला टी-२० मध्ये शतक झळकावणारी हरमनप्रीत ही पहिली भारतीय महिला क्रिकेटर देखील आहे.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर नाणेफेक जिंकून त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ६ बाद १५५ धावा केल्या. त्याचबरोबर आयर्लंड संघासमोर १५६ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.