नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघाला अंतिम फेरी गाठण्यात यश आले, तरच कर्णधार हरमनप्रीत कौरला यंदा आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळण्याची संधी मिळणार आहे. हांगझो येथे होणाऱ्या या स्पर्धेसाठी भारताच्या महिला आणि पुरुष क्रिकेट संघांना थेट उपांत्यपूर्व फेरीत स्थान देण्यात आले आहे.
भारतासह पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेशचे महिला आणि पुरुष संघ थेट उपांत्यपूर्व फेरीत खेळतील. १ जून रोजीची ट्वेन्टी-२० क्रमवारी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत ट्वेन्टी-२० सामने खेळवले जाणार आहेत.
बांगलादेशविरुद्धच्या अखेरच्या एकदिवसीय सामन्यात केलेल्या गैरवर्तणुकीमुळे हरमनप्रीतवर ‘आयसीसी’ने दोन सामन्यांची बंदी घातली आहे. त्यामुळे तिला आशियाई क्रीडा स्पर्धेतील उपांत्यपूर्व आणि भारतीय संघ पात्र ठरल्यास उपांत्य फेरीतील सामन्यात खेळता येणार नाही. ती केवळ अंतिम सामन्यासाठी उपलब्ध असेल. मात्र, यासाठी भारतीय महिला संघाला उपांत्यपूर्व आणि उपांत्य सामने जिंकावे लागतील.
आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांचे १८ संघ, तर महिलांचे १४ संघ खेळणार आहेत. महिलांचे सामने १९ सप्टेंबरपासून खेळवले जाणार असून अंतिम लढत २६ सप्टेंबरला होणार आहे. पुरुषांच्या सामन्यांना २८ सप्टेंबरपासून सुरुवात होणार असून अंतिम लढत ७ ऑक्टोबरला होईल.