Harmanpreet Kaur losses his calm BAN-W vs IND-W: ढाका येथे भारत आणि बांगलादेश महिला क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या वन डे मालिकेतील शेवटचा सामना बरोबरीत सुटला आणि त्यामुळे तीन सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत संपली. ट्रॉफीही दोन्ही संघांना वाटून घ्यावी लागली. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना फरगाना हकच्या शतकाच्या जोरावर २२५ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघालाही केवळ २२५ धावाच करता आल्या आणि सामना बरोबरीत सुटला.
बांगलादेश विरुद्ध भारतीय महिला क्रिकेट संघ यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात हरमनप्रीत कौरचा राग अनावर झालेला दिसला. रागाच्या भरात तिने स्टंपच्या दिशेने बॅट भिरकावली आणि अंपायरलाशी तिने हुज्जत घातली. अंपायरने तिला आऊट दिल्यावर हा सर्व प्रकार घडला, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.
भारत विरुद्ध बांगलादेश तिसरा आणि मालिका निर्णायक एकदिवसीय सामन्यात भारतासमोर विजयासाठी 225 धावांचे लक्ष्य ठेवले होते. धावांचा पाठलाग करताना सलामीवीर शफाली वर्मा ४ धावा करून बाद झाली तर यास्तिका भाटिया केवळ ५ धावा करू शकली. हरलीन देओलसह स्मृती मंधाना यांनी डाव सावरला आणि तिसऱ्या विकेटसाठी १०७ धावांची भागीदारी केली. मंधानाने शानदार अर्धशतक केले पण त्यानंतर ती ५९ धावांवर बाद झाली. स्मृती झाल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरही लवकर बाद झाली तिने १४ धावा केल्या. हरमनप्रीत कौरला अंपायरच्या चुकीच्या निर्णयाचा फटका बसला. त्यानंतर तिने अंपायरवर इतका राग व्यक्त केला.
हरमनप्रीत कौरला इतका राग का आला?
हरमनप्रीत कौरने नाहिदा अॅक्टरने टाकलेला ३४व्या षटकातील चौथा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू पॅडला लागला. अपील आल्यावर अंपायरने लगेच बाद घोषित केले. यावर हरमनप्रीतला राग आला, तिच्या म्हणण्यानुसार चेंडू आधी बॅटला लागला होता. संतापलेल्या हरमनप्रीतने यानंतर स्टंपवर बॅट फेकून मारली, ज्यामुळे बेल्स खाली पडले. ड्रेसिंगरूममध्ये जात असताना हरमनप्रीत कौर अंपायरला रागाने काहीतरी बोलत होती, ती तिची बॅट दाखवत बॉल आधी बॅटला लागल्याचे सांगत होती. बरं, आता तिच्या या कृत्यामुळे तिला दंडही ठोठावला जाण्याची शक्यता आहे.
सामना बरोबरीत सुटला
भारत आणि बांगलादेश यांच्यातील मालिकेतील तिसरा आणि निर्णायक वनडे सामना बरोबरीत सुटला. शेवटच्या चार चेंडूंमध्ये भारताला विजयासाठी एका धावेची गरज होती, पण मेघना सिंगने यष्टिरक्षकाकडे झेल दिला आणि टीम इंडियाला सामना जिंकण्यापासून वंचित राहिली. यासह भारताने मालिका जिंकण्याची संधी गमावली. पावसामुळे वेळ वाया गेला आणि अधिकृत वेळ संपल्यामुळे सुपर ओव्हर होऊ शकली नाही. त्यामुळे मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. आता दोन्ही संघ ट्रॉफी शेअर करणार आहेत.
काय घडलं मॅचमध्ये?
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने ५० षटकांत ४ विकेट्स गमावून २२५ धावा केल्या. फरगाना हकने १०७ धावांची खेळी केली. शमीमानेही ५२ धावा केल्या. भारताकडून स्नेह राणाने दोन आणि देविका वैद्यने एक विकेट घेतली. प्रत्युत्तरात भारतीय संघाला ४९.३ षटकांत सर्व १० विकेट्स गमावून २२५ धावाच करता आल्या. भारताकडून हरलीन देओलने सर्वाधिक ७७ धावा केल्या. स्मृती मंधानानेही ५९ धावांची खेळी केली. जेमिमा ३३ धावा करून नाबाद राहिली, पण ती आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. बांगलादेशकडून नाहिदा अख्तरने तीन आणि मारुफाने दोन विकेट्स घेतल्या. राबेया, फहिमा आणि सुलताना यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. भारताने शेवटच्या सहा विकेट्स केवळ ३४ धावांत गमावल्या आणि तिथेच सामना हातून निसटला.
खराब अंपायरिंगवरून वाद
या सामन्यातील खराब अंपायरिंगचीही खूप चर्चा झाली. यास्तिका भाटियापासून ते हरमनप्रीत कौर आणि मेघना यांच्या महत्त्वपूर्ण विकेट्सपर्यंत, प्रत्येक प्रसंगी भारतीय खेळाडू अंपायरच्या निर्णयावर नाराज असल्याचे दिसून आले. याच कारणामुळे टीम इंडियाला बांगलादेशसोबत ट्रॉफी शेअर करावी लागली.