भारतीय महिलांचा संघ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात जरी पराभूत झाला असला, तरीही काही खेळाडूंनी केलेली खेळी कायम लोकांच्या लक्षात राहणारी आहे. हरमनप्रीत कौरला तिने विश्वचषकात केलेल्या खेळीचा मोठा फायदा झालेला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या क्रमवारीत हरमनप्रीत कौर सहाव्या स्थानावर येऊन पोहचली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेल्या शतकी खेळीचा हरमनप्रीतला आपलं रँकिंग सुधारण्यात फायदा झालेला आहे.

मिताली राजनंतर सर्वोत्तम खेळाडूंच्या यादीत प्रवेश करणारी हरमनप्रीत ही दुसरी भारतीय खेळाडू ठरली आहे. सध्याच्या क्रमवारीत भारताची कर्णधार मिताली राज ही दहाव्या क्रमांकावर आहे. हरमनप्रीतनंतर मुंबईच्या पुनम राऊतला अंतिम फेरीतल्या आपल्या खेळीचा फायदा झाला आहे, जागतिक क्रमवारीत पुनम १४ व्या स्थानावर पोहचली आहे. तर वेदा कृष्णमुर्तीलाही आपल्या खेळाचा फायदा झाला आहे, जागतिक क्रमवारीत ती २६ व्या स्थानावर पोहचली आहे.

फलंदाजीप्रमाणे आयसीसीच्या गोलंदाजांच्या यादीतही भारतीय खेळाडूंना मोठा फायदा झाला आहे. अंतिम फेरीत टिच्चून केलेल्या माऱ्यामुळे झुलन गोस्वामी जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहचली आहे. याव्यतिरीक्त शिखा पांडे १२ व्या स्थानावर तर पुनम यादव २८ व्या स्थानावर पोहचली आहे. इतर खेळाडूंमध्ये अंतिम फेरीत ६ बळी घेणाऱ्या अॅना शर्बसोललाही जागतिक क्रमवारीत फायदा झालेला आहे. जागतिक क्रमवारीत अॅना सातव्या क्रमांकावर पोहचली आहे.