भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला क्रिकेट सामन्यादरम्यान रागाच्या भरात स्टम्प (यष्टी) तोडणं महागात पडलंय. आयसीसीने तिच्यावर दोन सामन्यांची बंदी घातली आहे. आता ती भारतीय महिला संघासाठी पुढचे दोन क्रिकेट सामने खेळू शकणार नाही. बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील तिसर्या सामन्यात हरमनप्रीत कौर बाद झाल्यावर तिने स्टम्पवर बॅट फेकली. कारण, ती पंचांच्या निर्णयावर नाराज होती. आपण बाद नसूनही पंचांनी बाद घोषित केलं आहे असा तिचा दावा होता. तसेच ही मालिका संपल्यानंतर, जेव्हा दोन्ही संघ चषकाबरोबर फोटोसाठी पोझ देत होते, तेव्हा हरमनप्रीतने पंचांनाही बोलावण्यास सांगितले होतं. पंचांमुळे हा सामना अनिर्णित राहिला असल्याचं तिचं म्हणणं होतं.
आयसीसीने दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये हरममप्रीतला दोषी ठरवलं असून तिच्यावर आता कारवाई केली आहे. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेनंतर आता भारतीय महिला संघ थेट आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळणार आहे. या स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यांना हरमनप्रीत मुकणार आहे. या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघाला कर्णधार आणि मधल्या फळीतल्या भरवशाच्या फलंदाजाशिवाय खेळावं लागणार आहे. त्यामुळे हरमनता राग टीम इंडियाला महागात पडला आहे, असं बोललं जात आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व स्मृती मांधना करू शकते.
त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं?
बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात हरमनप्रीत कौरने नाहिदा अख्तरने टाकलेल्या ३४ व्या षटकातील चौथा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू पॅडला लागला. यावर बांगलादेशच्या संघाने अपील केलं. त्यापाठोपाठ पंचांनी हरमनला बाद घोषित केलं. हरमनच्या म्हणण्यानुसार चेंडू आधी बॅटला लागला आणि मग पॅडवर आदळला. त्यामुळे संतापलेल्या हरमनप्रीतने स्टंपवर बॅट फेकून मारली. तसेच ड्रेसिंग रूममध्ये जात असताना हरमनप्रीत कौर पंचांकडे पाहून काहीतरी पुटपुत होती. तसेच हातातल्या बॅटने इशाऱ्याने सांगत होती की, बॉल आधी बॅटला लागला होता.
हरमनप्रीत एवढ्यावरच थांबली नाही तर तिने सामना संपल्यावर शेवटी फोटोसेशनच्या वेळी पंचांनाही बोलावण्यास सांगितलं. हरमनप्रीत म्हणाली, “फक्त आपण दोनच संघ इथे का आहोत? पंचांनाही बोलवा ज्यांनी तुमच्यासाठी सामना अनिर्णित केला. आम्हाला त्यांच्याबरोबरी एक फोटो काढण्याची इच्छा आहे.”
याप्रकरणी आयसीसीने हरमनप्रीतला दंडदेखील ठोठावला आहे. हरमनप्रीत कौरला तिच्या सामन्याच्या मानधनापैकी ७५ टक्के दंड भरावा लागेल. तसेच तिचे दोन गुणही कमी केले आहेत.