नवी दिल्ली : विजयी क्रिकेटवीरांचे स्वागत नेहमीच पाहिले, पण आता आमचे असे जल्लोषात स्वागत झालेले पाहून काय बोलावे हेच सुचत नाही. अशा वेळी स्वत:चा अभिमान वाटतो आणि जबाबदारी वाढल्याची जाणीवदेखील होत असल्याची भावना कांस्यपदक विजेत्या भारतीय संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंगने व्यक्त केली.
पॅरिस ऑलिम्पिक सोहळ्यासाठी गोलरक्षक श्रीजेशला ध्वजवाहकाचा मान मिळाला आहे. यासाठी श्रीजेश आणि अमित रोहिदास, राजकुमार पाल, अभिषेक, सुखजित सिंग आणि संजय हे खेळाडू पॅरिसमध्येच थांबले आहेत. संघातील उर्वरित खेळाडू शनिवारी मायदेशी परतले तेव्हा इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर या खेळाडूंचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. ऑलिम्पिक स्पर्धेतील कामगिरीसाठी असणाऱ्या अपेक्षांच्या ओझ्यांनी भारतीय खेळाडू वाकले नाहीत, पण चाहत्यांच्या प्रेमापुढे ते नतमस्तक झाले. ढोल ताशांचा गजर आणि भांगडा वा ठेका यामुळे परिसरात एक प्रकारचे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. चाहत्यांकडच्या पुष्पहारांची संख्या इतकी होती की, एक वेळ खेळाडूंचे चेहरेदेखील दिसत नव्हते. शेवटी खेळाडू हार घातला की लगेच काढून टाकत होते. या सगळ्या वातावरणाने खेळाडू भारावून गेले. त्यांच्या चेहऱ्यावरील भाव असेच काहीसे सांगून जात होते.
हेही वाचा…हुकलेली ‘सुवर्ण’संधी, की चितपट झालेले ‘डावपेच’?
‘‘आम्हाला प्रचंड पाठिंबा मिळाला. चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळाले. ऑलिम्पिक पदकाच्या अनुभवाबरोबर या प्रेमाने आमची झोळी भरभरून वाहत आहे. खूप आनंद झाला आहे. आम्हाला पदकविजेते झाल्याचा अभिमान वाटतो आणि दुसरीकडे जबाबदारी वाढल्याची भावनादेखील निर्माण झाली. या प्रेमामुळे जेव्हा जेव्हा मैदानात उतरू तेव्हा आम्ही पदक घेऊन परतू. हा विजय चाहत्यांसाठी इतका अवर्णनीय असेल, तर आमच्यासाठी किती ही कल्पना करा. संघातील प्रत्येक खेळाडूने ऑलिम्पिक तयारीसाठी अथक प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि त्यामुळे संपूर्ण देश आनंदोत्सव साजरा करत आहे. अभिमान वाटावा अशीच ही कामगिरी आहे,’’ असे हरमनप्रीत म्हणाला.
क्रीडामंत्र्यांकडून हॉकी संघाचा सत्कार
क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळवणाऱ्या भारतीय हॉकी संघाचा शनिवारी सत्कार केला. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारताने स्पेनला २-१ असे नमवित सलग दुसऱ्यांदा कांस्यपदक मिळवले. ‘‘संपूर्ण देशाला तुमच्या कामगिरीचा अभिमान आहे. या कामगिरीसह देशातील अनेक युवा खेळाडूंना तुम्ही प्रेरित केले आहे. हॉकी आपल्यासाठी खेळाहून अधिक आहे. संघाला कठोर मेहनत, खेळाप्रती असलेली वचनबद्धता यामुळे यश मिळाले आहे,’’ असे मांडवीय यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.