राजस्थान रॉयल्सचा उदयोन्मुख खेळाडू हरमित सिंगसुद्धा स्पॉट-फिक्सिंगच्या जाळ्यात ओढला जाणार होता. मात्र तो खूपच युवा खेळाडू असल्यामुळे त्याचा उपयोग होणार नाही असे लक्षात आल्यानंतर आम्ही हा प्रयत्न सोडून दिला, असे सट्टेबाज जितेंदरसिंग याने निवेदन दिले आहे.
दिल्ली पोलिसांनी याबाबत माहिती देताना सांगितले, ‘‘जितेंदर सिंग हा अहमदाबादचा सट्टेबाज आहे आणि आयपीएल स्पॉट-फिक्सिंगशी त्याचे संबंध आहेत. त्याच्यावर काही युवा खेळाडूंना फिक्सिंगमध्ये आणण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्याने पोलिसांना दिलेल्या निवेदनातच ही माहिती दिली आहे.’’
दरम्यान, येथील पोलिसांनी जयपूर पोलीस आयुक्तांना राजस्थान रॉयल्स फ्रँचाईजीचे भागीदार राज कुंद्रा व त्याची पत्नी शिल्पा शेट्टी यांच्याविरुद्ध असलेल्या सट्टेबाजीच्या आरोपांबाबत चौकशी करण्याविषयी विनंती केली आहे.
राजस्थान रॉयल्स व किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात झालेल्या सामन्यात सट्टेबाजीद्वारे जितेंदर सिंग याने ७० ते ८० लाख रुपयांची कमाई केली असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.
याच सामन्यात स्पॉट-फिक्सिंग केल्याचा आरोप राजस्थानचा गोलंदाज एस.श्रीशांत याच्यावर ठेवण्यात आला आहे.