‘आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतील (आयसीसी) भारताचे विरोधक’ अशी ओळख असणाऱ्या हारून लॉरगट यांची दक्षिण आफ्रिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) नियुक्ती करण्यात आली आहे. आयपीएल संदर्भातील वादविवाद प्रकरणी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात गेरार्ल्ड माजोला यांची सीईओ पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती.
आयसीसीमध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सर्वाधिक वजन आहे ते आर्थिक मिळकतीमुळे. त्यामुळे भारताशी आयसीसीचा कोणताही अधिकारी पंगा घेत नाही. पण लॉरगट आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना बीसीसीआय आणि त्यांच्यामध्ये खटके उडाले होते. पंचांच्या विरोधात न्याय मागण्याची प्रणाली (डीआरएस) आणि भविष्यातील कार्यक्रम ठरवण्यामध्ये लॉरगट आणि बीसीसीआय यांच्यात एकमत झाले नव्हते. मंडळातील महत्त्वाची जागा रिक्त असल्याने आम्हाला ती भरायची होती आणि लॉरगट यांची या पदासाठी केलेली नियुक्ती योग्य असल्याचे दक्षिण आफ्रिकेच्या मंडळाचे अध्यक्ष ख्रिस नेन्झानी यांनी सांगितले.
यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या मंडळाचे खजिनदारपद लॉरगट यांनी भूषवले होते, त्याचबराोबर निवड समितीचे संयोजक म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. त्यानंतर २००८ साली त्यांची आयसीसीच्या प्रमुख कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.
५३ वर्षीय लॉरगट यांच्या नियुक्तीमुळे दोन्ही देशांच्या मंडळांच्या नात्यामध्ये दुरावा येईल, असे म्हटले जात असले तरी दोन्ही देशांच्या मंडळांनी याला दुजोरा दिलेला नाही. लॉरगट यांना जर दक्षिण आफ्रिकेने कोणतेही पद दिले तर आगामी दौरा रद्द करण्याची धमकी बीसीसीआयने दिली असल्याचेही म्हटले जात आहे.

Story img Loader