Harry Brook 8th Test Century: न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना इंग्लिश संघाने जिंकला होता, तर आजपासून वेलिंग्टनच्या मैदानावर दोन्ही संघांमध्ये मालिकेतील दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे, ज्यामध्ये पुन्हा एकदा हॅरी ब्रूकची शतकी खेळी पाहायला मिळाली. ब्रूकने १२३ धावांची खेळी करत कसोटी कारकिर्दीतील अवघ्या २३व्या कसोटी सामन्यात त्याने ८वे शतक झळकावले. ब्रुकने आपल्या या शतकासह अनेक दिग्गज खेळाडूंना मागे टाकलं आहे.
हॅरी ब्रुक जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा इंग्लंडच्या संघाची अवस्था खूपच वाईट होती, ४३ धावा करून चार खेळाडू पॅव्हेलियनमध्ये परतले होते, इथून ब्रूकने इंग्लंड संघाच्या डावाची धुरा सांभाळली मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. हॅरी ब्रुक धावबाद होण्यापूर्वी त्याने ११५ चेंडूत ११ चौकार आणि ५ षटकारांसह १२३ धावा केल्या. ओली पॉप आणि ब्रुकच्या भागीदारीच्या जोरावर इंग्लंडचा संघ पहिल्या डावात २८० धावा करू शकला.
हॅरी ब्रुकचं ऐतिहासिक कसोटी शतक
हॅरी ब्रूकने २०२४ साली कसोटी क्रिकेटमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे, ज्यामध्ये त्याने या वर्षात आतापर्यंत एक हजार कसोटी धावा पूर्ण केल्या आहेत. हॅरी ब्रूक या शतकासह डॉन ब्रॅडमनसारख्या दिग्गजांच्या यादीत सामील झाला आहे. ब्रुक कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद आठ शतकं झळकावणारा फलंदाज बनला आहे.
ब्रुकने आपल्या कसोटी कारकिर्दीतील ३८व्या डावात हा पराक्रम केला. यासह, तो २०२४ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये १ हजार धावा पूर्ण करणारा चौथा फलंदाज बनला आहे, ज्यामध्ये त्याच्याआधी जो रूट, यशस्वी जैस्वाल आणि बेन डकेट यांनी ही कामगिरी केली होती.
हॅरी ब्रुकची परदेशी भूमीवर कसोटी कारकिर्दीतील ही १६वी कसोटी खेळी होती, ज्यामध्ये तो सर्वाधिक शतकं करणारा खेळाडू ठरला आहे. यासह त्याने डॉन ब्रॅडमन यांना मागे टाकले आहे. डॉन ब्रॅडमन यांनी परदेशी भूमीवर १६ डावांत ६ शतकं झळकावली होती.
परदेशी भूमीवर १६ कसोटी डावांनंतर सर्वाधिक कसोटी शतकं (Most Test Centuries after 16 Away innings)
हॅरी ब्रुक*- ७ शतकं
डॉन ब्रॅडमन- ६ शतकं
केन बॅरिंग्टन- ६ शतकं
नील हार्वे – ६ शतकं
हॅरी ब्रुकने न्यूझीलंड संघाविरूद्ध तीन शतकं झळकावली आहेत, जी यजमान संघाच्या मैदानावरच केली आहेत. न्यूझीलंडविरुद्ध ५वा कसोटी सामना खेळताना शतक करत हॅरी ब्रूकच्या ६०० धावांचा टप्पा गाठला आहे. ब्रूकने न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या ६ कसोटी डावांमध्ये ५० हून अधिक धावांच्या खेळी केल्या आहेत.