Harry Brook breaks Vinod Kambli’s record: न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना विल्मिंग्टन येथे खेळवला जात आहे. या सामन्यात इंग्लंडचा संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. हॅरी ब्रूकने इंग्लंडसाठी शानदार कामगिरी केली. त्याने आपल्या झंझावाती खेळीच्या जोरावर विनोद कांबळीचा ३० वर्षापूर्वीचा जुना विक्रम मोडीत काढला. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला ९ कसोटी डावांत ८०० हून अधिक धावा करणारा ब्रूक पहिला खेळाडू ठरला आहे.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडची सुरुवात खराब झाली. सलामीवीर चेक क्रोली अवघ्या २ धावा करून बाद झाला. यानंतर बेन डकेटने ९ धावा केल्या. ओली पॉप ६ चेंडूत १० धावा करून बाद झाला. मात्र जो रूट आणि हॅरी ब्रूक यांनी शानदार प्रदर्शन करत सामन्याचा मार्गच बदलून टाकला. वृत्त लिहेपर्यंत या दोघांमध्ये ३०२ धावांची भागीदारी केली. ब्रूकने १८६ (१५६) धावा केल्या. त्याने विनोद कांबळीचा विक्रम मोडला.
हॅरी ब्रूकने मोडला विनोद कांबळीचा ३० वर्षापूर्वीचा विक्रम –
हॅरी ब्रूक हा आपल्या कारकिर्दीतील पहिल्या ९ कसोटी डावात 800 किंवा त्याहून अधिक धावा करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. त्याने आतापर्यंत ९ डावात ४ शतके आणि ३ अर्धशतके केली आहेत. यासह ८०७ धावा झाल्या आहेत. ब्रूकच्या आधी हा विक्रम कांबळीच्या नावावर होता. त्याने ९ कसोटी डावांमध्ये सर्वाधिक ७९८ धावा केल्या. यादरम्यान त्याने चार शतके आणि दोन द्विशतके झळकावली.
हेही वाचा – KCC T20 Championship 2023: अभिनेता किच्चा सुदीप क्रिकेटच्या दिग्गजांसोबत पार्टी करताना दिसला, पाहा फोटो
ब्रूकने ८०० हून अधिक धावा करून अनेक दिग्गजांना मागे सोडले. या यादीत सुनील गावस्कर यांच्या नावाचाही समावेश आहे. गावस्कर यांनी ९ डावात ७७८ धावा केल्या. एव्हर्टन वीक्सने ९ डावात ७७७ धावा केल्या. विशेष म्हणजे ब्रूकने फार कमी वेळात संघात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. तो ३ वनडे खेळला आहे. यासोबतच २० टी-२० आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले गेले आहेत. ब्रूकने या फॉरमॅटमध्ये ३७२ धावा केल्या आहेत.