इंडियन प्रीमियर लीग २०२५ (IPL 2025)पूर्वी दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा युवा खेळाडू हॅरी ब्रूकने सलग दुसऱ्या सत्रात न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, त्याला जगातील सर्वात लोकप्रिय फ्रँचायझी लीगमधून दोन वर्षांच्या बंदीला सामोरे जावे लागू शकते. मात्र, याबाबत आयपीएलकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही.
नोव्हेंबरमध्ये झालेल्या मेगा लिलावात ब्रूकला दिल्ली कॅपिटल्सने ६.२५ कोटी रुपयांना संघात सामील केले होते. ब्रूकने राष्ट्रीय संघाच्या त्याच्या वचनबद्धतेचे कारण सांगत त्याने हा निर्णय घेतल्याचे सांगितले. चॅम्पियन्स ट्रॉफीमधील गट टप्प्यातून बाहेर पडल्यानंतर जोस बटलरने इंग्लंडचा पांढऱ्या चेंडूचा कर्णधार म्हणून राजीनामा दिला. त्याची जागा घेण्यासाठी ब्रूक हा प्रबळ दावेदार मानला जात आहे. तिन्ही फॉरमॅटसाठी त्याचा इंग्लंड क्रिकेट बोर्डाबरोबरचा केंद्रीय करार सध्या १८ महिन्यांसाठी आहे, त्यामुळे वर्कलोड मॅनेजमेंट हे त्याने एक माघार घेण्याचे कारण ठरू शकते.
हॅरी ब्रूक म्हणाला, “मी आगामी आयपीएलमधून बाहेर पडण्याचा खूप कठीण निर्णय घेतला आहे. मी दिल्ली कॅपिटल्स आणि त्यांच्या चाहत्यांची माफी मागतो. मला क्रिकेट खूप आवडते. मी लहान असल्यापासून माझ्या देशासाठी खेळण्याचे स्वप्न पाहत होतो आणि या स्तरावर माझा आवडता खेळ खेळण्याची संधी मिळाल्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे.
हॅरी ब्रूकवर २ वर्षांची बंदी का घातली जाऊ शकते?
आता आयपीएलच्या आयोजकांनी नवी नियमावली जाहीर केली आहे. या नियमांच्या आधारे हॅरी ब्रूकवर २ वर्षांची बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. २०२५ च्या मेगा लिलावापूर्वीच आयपीएलने हा नियम जारी केला होता की लिलावात सोल्ड झालेल्या एखाद्या खेळाडूने लीगमधून आपले नाव मागे घेतले तर त्याला २ वर्षांच्या बंदीला सामोरे जावे लागेल.
नवीन नियम २०२५ च्या लिलावापूर्वी लागू करण्यात आला आणि परदेशी खेळाडूंनी शेवटच्या क्षणी माघार घेण्याबाबत निराशा व्यक्त केलेल्या सर्व १० फ्रँचायझींच्या अभिप्रायावर आधारित आहे. गेल्या सप्टेंबरमध्ये फ्रँचायझींना दिलेल्या नोटमध्ये, IPL ने म्हटले आहे की, “कोणताही [विदेशी] खेळाडू जो लिलावासाठी आपले नाव देतो आणि लिलावात निवड झाल्यानंतर हंगाम सुरू होण्यापूर्वी माघार घेतो, त्याला दोन हंगामांसाठी आयपीएल लिलावात भाग घेण्यास बंदी घालण्यात येईल.” गव्हर्निंग काऊन्सिलने सांगितले की “दुखापत किंवा वैद्यकीय स्थितीसाठी अपवाद केले जातील, ज्याला खेळाडूच्या क्रीडा बोर्डाने माहिती द्यावी लागेल.”
— Harry Brook (@Harry_Brook_88) March 9, 2025
ब्रूक, जो आयपीएल २०२४ मधून देखील बाहेर झाला होता, तो आयपीएल २०२३ मध्ये सनरायझर्स हैदराबादचा भाग होता. त्याने ११ सामन्यात १९० धावा केल्या. ब्रूकला SRH ने १३.२५ कोटी रुपयांना विकत घेतले.