इंग्लंड क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू हॅरी ब्रूक हा सध्या चर्चेत आहेत. अलिकडच्या काही महिन्यांमध्ये टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधील त्याच्या कामगिरीमुळे त्याने स्वतःचं संघातलं स्थान कायम केलं आहे. ब्रूकने अद्याप एकदिवसीय क्रिकेटवर छाप पाडलेली नाही. हॅरी ब्रूक गेल्या वर्षीपासून इंडियन प्रीमियर लीगमध्येदेखील खेळतोय. सनरायझर्स हैदराबादने त्याला गेल्या वर्षी १३.२५ कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यातील शतकी खेळीशिवाय संपूर्ण स्पर्धेत त्याने इतर कुठलीही लक्षवेधी खेळी साकारली नव्हती.
आयपीएलच्या गेल्या हंगामावेळी हॅरी ब्रूक केकेआरविरुद्धच्या सामन्यातील शतकाशिवाय आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत आला होता. शतक झळकावल्यानंतर त्याने म्हटलं होतं की, माझी आजची खेळी पाहून अनेक भारतीय चाहते म्हणतील की मी उत्तम खेळलो. परंतु, काही दिवसांपूर्वी हेच क्रिकेटरसिक माझी निंदा करत होते. मला आनंद आहे की मी त्यांना गप्प करू शकलो. दरम्यान, ब्रूकने त्याच्या या वक्तव्यावर आता प्रतिक्रिया दिली आहे.
इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात हॅरी ब्रूकने अर्धशतक लगावलं. या सामन्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ब्रूक म्हणाला, मी मूर्ख होतो आणि मी का मुलाखतीत वेड्यासारखं ते वक्तव्य केलं होतं, ज्याचा मला आज खूप पश्चाताप होतोय.
हे ही वाचा >> BAN vs NZ: किवींनी घेतला मॅथ्यूजचा बदला! ना कॅच, ना एलबीडब्ल्यू; विचित्र पद्धतीने बाद झाला ‘हा’ बांगलादेशी फलंदाज
हॅरी ब्रूक म्हणाला, भारतात असताना सामना संपल्यावर मी माझ्या हॉटेल रूममध्ये बसून फोनवर स्क्रोल करत होतो. बऱ्याचदा वेळ घालवण्यासाठी आपण तेच करतो. परंतु, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर स्क्रोल करताना मी अशा काही गोष्टी पाहिल्या ज्या मी पाहायला नको होत्या, ज्याचा मला त्रास झाला होता. त्यातूनच माझ्या तोंडून ते वाक्य निघालं. परंतु, आज मला त्याचा खूप पश्चाताप होतोय.