Harry Brook’s fastest Test 1000 runs: ॲशेसच्या तिसऱ्या कसोटीत इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा ३ विकेट्स राखून पराभव केला. लीड्स कसोटीच्या चौथ्या डावात २५१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने ७ गडी गमावून हे लक्ष्य गाठले. या विजयाचा नायक हॅरी ब्रूक ठरला. त्याने सर्वाधिक ७५ धावांची खेळी केली. इंग्लंडला विजय मिळवून देणाऱ्या हॅरी ब्रूकने एक मोठा विक्रम केला आहे. इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रूक हा कसोटी सामन्यात सर्वात कमी चेंडूत हजार धावा करणारा खेळाडू ठरला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हॅरी ब्रूक हा कसोटी सामन्यात सर्वात कमी चेंडूत हजार धावा करणारा इंग्लंडचा पहिला खेळाडू ठरला आहे. हॅरी ब्रूकने कसोटी फॉरमॅटमध्ये १०५८ चेंडूत हजार धावांचा टप्पा पार केला. त्याचबरोबर या यादीत न्यूझीलंडचा कॉलिन डी ग्राम होम पहिल्या क्रमांकावर आहे. या किवी खेळाडूने कसोटी फॉरमॅटमध्ये ११४० चेंडूत १००० धावांचा टप्पा गाठला. या विशेष यादीत तिसरे नाव आहे न्यूझीलंडच्या टीम साऊदीचे.

या यादीत कोणाचा आहे समावेश?

न्यूझीलंडचा खेळाडू टीम साऊदीने ११६७ चेंडूत कसोटीत हजार धावांचा टप्पा पार केला. त्याचबरोबर या प्रकरणात इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेट चौथ्या क्रमांकावर आहे. बेन डकेटने कसोटी फॉरमॅटमध्ये ११६८ चेंडूत १००० धावांचा टप्पा गाठला आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लीड्स कसोटीत इंग्लंडच्या हॅरी ब्रूकने नवा विक्रम केला आहे. या इंग्लिश फलंदाजाने १०५८ चेंडूत हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे.

हॅरी ब्रूकने ७५ धावांची शानदार खेळी साकारली –

इंग्लंडसाठी दुसऱ्या डावात युवा स्टार हॅरी ब्रुकने ९३ चेंडूचा सामना करताना ९ चौकारांच्या मदतीने ७५ धावांची शानदार खेळी केली. ब्रूकशिवाय सलामीवीर जॅक क्रॉलीने ४४ धावांचे योगदान दिले. बेन डकेट २३, जो रूट २१ आणि कर्णधार बेन स्टोक्स १३ धावा करून बाद झाले. मोईन अली आणि जॉनी बेअरस्टो यांना प्रत्येकी पाच धावाच करता आल्या. ख्रिस वोक्सने नाबाद ३२ आणि मार्क वुडने नाबाद १६ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कने पाच विकेट घेतल्या. मिचेल मार्श आणि पॅट कमिन्स यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Harry brooke has become the second fastest batsman in the world to score 1000 runs in test cricket vbm