Harry Brook pulls out of Test series in India : भारताविरुद्ध २५ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी इंग्लंड संघाला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा स्टार फलंदाज हॅरी ब्रूक भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत सहभागी होणार नाही. हॅरी ब्रूक वैयक्तिक कारणांमुळे इंग्लंडला परतत असून कसोटी मालिका खेळण्यासाठी तो पुन्हा भारतात येणार नसल्याचे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने एक निवेदन जारी केले आहे. हॅरी ब्रूकच्या बदलीची घोषणा अद्याप ईसीबीने केलेली नाही. मात्र, ब्रूकच्या अनुपस्थितीमुळे इंग्लंडच्या बॅझबॉल शैलीला मोठा फटका बसणार आहे.
ईसीबीने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, “हॅरी ब्रूक वैयक्तिक कारणांमुळे भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतून तात्काळ माघार घेतली आहे, तो भारत दौऱ्यावर संघाचा भाग असणार नाही. हॅरी ब्रूक कसोटी मालिका खेळण्यासाठी भारतात परतणार नाही. या कठीण काळात ब्रुकच्या कुटुंबीयांनी गोपनीयतेचे आवाहन केले आहे. ब्रुकच्या कुटुंबाच्या गोपनीयतेची काळजी घेतली जावी आणि त्यांच्या खाजगी जीवनात हस्तक्षेप केला जाऊ नये, अशी आमची इच्छा आहे. ब्रूकच्या बदलीची घोषणा ईसीबीकडून लवकरच केली जाईल.”
ब्रूक हा कसोटी क्रिकेटचा पुढचा स्टार –
हॅरी ब्रूक हा इंग्लंडच्या मधल्या फळीतील सर्वात धोकादायक खेळाडूंपैकी एक आहे. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून, ब्रूक हा सतत चर्चेचा विषय बनला आहे. त्याच्याकडे क्रिकेट जगतातील पुढील सर्वात मोठा स्टार म्हणून पाहिले जात आहे. ब्रूकने आतापर्यंत १२ कसोटी सामने खेळताना ११८१ धावा केल्या आहेत. या काळात ब्रुकची सरासरी ६२.१६ राहिली आहे. एवढेच नाही तर ब्रूकने कसोटी क्रिकेटमध्ये ४ शतके आणि ७ अर्धशतकेही केली आहेत. अलीकडेच, हॅरी ब्रूकला आयपीएलच्या १७ व्या हंगामासाठी दिल्ली कॅपिटल्सने ४ कोटी रुपयांची बोली लावून विकत घेतले.
हेही वाचा – IND vs ENG : इंग्लंड संघाला मोठा धक्का, ‘हा’ स्टार खेळाडू भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतून झाला बाहेर
भारत दौऱ्यासाठी इंग्लंड संघ : बेन स्टोक्स (कर्णधार), रेहान अहमद, जेम्स अँडरसन, गस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, शोएब बशीर, जॅक क्राउली, बेन डकेट, बेन फोक्स, टॉम हार्टले, जॅक लीच, ऑली पोप, ऑली रॉबिन्सन, जो रूट आणि मार्क वुड.
पहिल्या दोन कसोटींसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि आवेश खान.