ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मानहानीकारक पराभवावरून माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी भारतीय संघावर कोरडे ओढले आहे. संघातील खेळाडू भूतकाळातील चुकांमधून काहीच शिकत नसून, पुन्हा पुन्हा त्याच चुका खेळाडूंकडून होत आहेत. हे असेच सुरू राहणार असेल तर अशा वारंवार चूका करणाऱया खेळाडूंना संघातून काढून टाकण्याची वेळ आली आहे, असे रोखठोक मत माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले.
ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका संपली की त्वरित आपल्याला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. संघातील सर्वच नाही, पण काही खेळाडू चुकांतून काहीही शिकत नसल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे. तीन ते चारवेळा ऑस्ट्रेलिया दौऱयाचा अनुभव असणाऱया खेळाडूंकडूनही वारंवार जुन्याच चुका पुन्हा नव्याने होताना दिसत आहेत. जर २०१९ सालच्या विश्वचषकासाठी संघबांधणीसाठी प्रयत्न करायचे असतील तर नव्या खेळाडूंना संधी देण्याचा विचार केला गेला पाहिजे, असे गावसकर म्हणाले.
गावसकरांच्या टीकेचा रोख मुख्यत्वे भारतीय गोलंदाजीवर होता. तसेच फिरकीपटू आर. अश्विनला सलग दुसऱया सामन्यात न खेळवण्याच्या निर्णयावरही गावसकर यांनी नाराजी व्यक्त केली. गोलंदाज वारंवार त्याच त्याच चुका करत आहेतच, पण सलग दुसऱया सामन्यात अश्विनला न खेळविण्याचा निर्णय चुकीचा होता. कॅनबेरामधील परिस्थिती अश्विनच्या गोलंदाजीसाठी पोषक होती, असेही गावसकर पुढे म्हणाले.