Australia Won ICC Cricket World Cup 2023 against India: रविवारचा दिवस भारतीय संघाबरोबरच कोट्यवधी भारतीयांसाठी निराशाजनक राहिला. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये एकही सामना न गमावलेल्या भारतीय संघाला अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागला. त्यामुळे एकीकडे तिसऱ्यांदा विश्वचषक उंचावण्याचं भारताचं स्वप्न भंगलं असताना दुसरीकडे ऑस्ट्रेलियानं सहाव्यांदा विश्वचषक विजेतेपदाला गवसणी घातली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीयांमध्ये निराशा असली, तरी आपल्या तमाम भारतीय क्रिकेट चाहते आपल्या खेळाडूंच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहेत. आणि त्याहून खंबीरपणे उभा आहे संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड! अजूनही आपलं ‘द वॉल’ हे बिरूद सार्थ ठरवणाऱ्या द्रविडसाठी प्रसिद्ध क्रीडा समालोचक हर्षा भोगले यांनी खास पोस्ट शेअर केली आहे.
अंतिम सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी २४१ धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारतीय गोलंदाजांनी पहिल्या १० षटकांमध्ये त्यांच्या लौकिकाला साजेशी गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाची ३ बाद ४१ अशी अवस्था केली होती. पण त्यानंतर ट्रेविस हेड आणि मार्नस लाबुशेन यांच्या १९२ धावांच्या भागीदारीमुळे भारताच्या विजयाच्या आशा संपुष्टात आल्या. त्यानंतर भारतीय संघाच्या चेहऱ्यावर पराभवाची निराशा स्पष्टपणे दिसून येत होती. मोहम्मद सिराज आणि कर्णधार रोहित शर्मा यांना अश्रू अनावर झाल्याचं व्हायरल दृश्यांमध्ये दिसत आहे. त्यामुळे एकीकडे भारतीय संघासाठी या भावनांना आवर घालणं कठीण होत असताना राहुल द्रविड पत्रकार परिषदेत माध्यमांना सामोरा आला. त्याच्या या कृतीचं सर्वत्र कौतुक होत आहे.
राहुल द्रविड भारतीय संघाच्या पाठिशी ठाम
भारतीय संघाच्या कामगिरीचं आता परीक्षण होत असताना राहुल द्रविडनं मात्र संघाच्या कामगिरीचा अभिमान असल्याचं म्हटलं आहे. “आम्ही अजिबात संथ खेळ केला नाही. पहिल्या १० षटकांमध्ये संघाच्या ८० धावा फलकावर लागल्या होत्या. कधीकधी डावाला आकार देण्यासाठी तुम्हाला परिस्थितीनुसार खेळ करावा लागतो”, असं म्हणत राहुल द्रविडनं पत्रकार परिषदेत संघाची बाजू उचलून धरली. तसेच, “रोहित शर्मा हा एक उत्तम कर्णधार आहे”, असं म्हणून त्यानं कर्णधाराच्या कामगिरीचंही कौतुक केलं.
हर्षा भोगलेंची राहुल द्रविडसाठी पोस्ट
दरम्यान, पराभवानंतर माध्यमांना सामोरा आलेल्या राहुल द्रविडचं हर्षा भोगले यांनी कौतुक केलं आहे. “विश्वचषक अंतिम सामन्यानंतरची सकाळ.. पराभवामुळे निराशा तर आहेच. पण त्याचबरोबर याचीही जाणीव आहे की आपल्या संघानं अंतिम सामन्याआधीच्या सलग १० सामन्यांमध्ये सर्वोत्तम खेळ करून दाखवला. पण भारतीय संघाबरोबरच राहुल द्रविडचं विशेष कौतुक. ते जिंकत असताना हा पूर्ण काळ राहुल द्रविड पडद्यामागेच राहिला. पण जेव्हा संघाचा पराभव झाला, तेव्हा तो हिंमतीनं माध्यमांना सामोरा आला. त्यानं आपल्या खेळाडूंचं समर्थन केलं. रोहित शर्माबरोबरची त्याची जोडी हिट ठरली. आणि अर्थात, पत्रकार परिषदेत अपेक्षेप्रमाणेच तो अतिशय विनम्र होता..नेहमीप्रमाणे”, असं हर्षा भोगलेंनी आपल्या एक्सवरील (ट्विटर) पोस्टमध्ये म्हटलं आहे.
राहुल द्रविडच्या प्रशिक्षकपदाबाबत अनिश्चितता
दरम्यान, राहुल द्रविडचा मुख्य प्रशिक्षक म्हणून बीसीसीआयबरोबरचा करार फक्त या विश्वचषक स्पर्धेपर्यंतच होता. पुढेही पदावर कायम राहणार का? या प्रश्नावर राहुल द्रविडनं सूचक विधान केलं. “मी अजून त्यावर विचार केलेला नाही. मला त्यासाठी वेळच मिळाला नाही. वेळ मिळाल्यावर मी नक्की विचार करेन. मी फक्त या विश्वचषक स्पर्धेवर लक्ष केंद्रीत केलं होतं”, असं द्रविड म्हणाला. पुढील वर्षी टी-२० विश्वचषक स्पर्धा असून त्यासाठी राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक राहील का? याविषयी आता अनिश्चितता निर्माण झाली आहे.