भारतीय क्रिकेटपटू आवडत नसतील तर देश सोडून जा असा सल्ला क्रिकेट चाहत्यांना देणाऱ्या विराट कोहलीवर अनेकांनी टिका केली आहे. असे असले तरी भारतीय क्रिकेटपटू आवडण्या न आवडण्यावरून चाहत्यांशी झालेल्या वादासंदर्भात विराटला हर्ष भोगलेनं मोलाचा सल्ला दिला आहे. हर्षनं दोन ट्विट करुन यासंदर्भात विराटला समज दिली आहे.

आपल्या ट्विटमध्ये हर्षाने म्हटलंय, “सत्ता व प्रसिद्धी मिळाली की अशी माणसं आकर्षित होतात ज्यांना तुमची मतं पटतात. ते तुमची मत हिरीरीनं मांडतात कारण सत्ता व प्रसिद्धीच्या संगतीमुळे त्यांनाही त्याचा लाभ मिळतो. याच कारणामुळे प्रतिकूल मत मांडलं की लोकांच्या भुवया उंचावतात व टीका सहन करावी लागते.” त्यामुळे ज्यावेळी तुम्ही चाहत्यांना रुचेल असं बोलत असता, त्यावेळी चाहते तुम्हाला डोक्यावर घेतात कारण त्यात त्यांचाही फायदाच असतो. मात्र, तुम्ही विरुद्ध काही बोललात, संकेत मोडलेत की रोष पत्करावा लागतो अशा आशयाचं ट्विट हर्ष भोगलेनं केलं आहे.

विराट कोहलीने केलेले वक्तव्य हे लोकप्रिय व्यक्तींच्या व्यक्तव्यांचा कसा गवगवा केला जातो याचे उत्तम उदाहरण आहे. असा गवगवा करण्याची त्यांची इच्छा नसते ते त्यात इच्छा नसतानाही गोवले जातात. या गवगव्यामध्ये अनेकदा अशी मते व्यक्त होतात जी त्या लोकप्रिय व्यक्तींना जाणून घ्यावीशी वाटतात. अशा प्रकारे एखादे गवगवा करणारे वक्तव्य करणे प्रसिद्ध व्यक्तींने थांबवायला हवे, अशा आशयाचे ट्विटही हर्षाने केले आहे.

हर्षाच्या या ट्विटला हजारो रिट्विट मिळाले असून अनेकांनी त्यांच्या मताशी सहमती दर्शवली आहे. आता विराट हर्षाचा हा सल्ला मनावर घेतो की नाही हे त्याचे त्यालाच ठाऊक.