Harshit Rana became 1st Indian to make his T20I debut as a concussion substitute : भारतीय संघाने चौथ्या टी-२० सामन्यात इंग्लंड संघाचा १५ धावांनी पराभव केला. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने इंग्लंडला विजयासाठी १८२ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ केवळ १६६ धावांवर गारद झाला. भारताकडून या सामन्यात पदार्पण करणाऱ्या हर्षित राणाने शानदार कामगिरी करत तीन विकेट्स घेत विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. यासह त्याने इतिहास घडवला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवम दुबेच्या हेल्मेटला लागला चेंडू –

या सामन्यात टीम इंडियाची सुरुवात खूपच खराब झाली होती. भारताने दुसऱ्याच षटकात तीन विकेट्स गमावल्या होत्या. साकिब महमूदने इंग्लंडचे दुसरे षटक टाकले आणि या षटकात एकूण तीन विकेट घेतल्या. त्यामुळे टीम इंडिया अडचणीत आली होती. यानंतर अभिषेक शर्मा आणि रिंकू सिंगने काही काळ विकेटवर टिकून राहण्याचा प्रयत्न केला, मात्र या खेळाडूंना मोठी खेळी करता आली नाही. यानंतर शिवम दुबे आणि हार्दिक पंड्याने अर्धशतके झळकावली. दोन्ही खेळाडूंनी ५३-५३ धावांची खेळी केली. या खेळाडूंमुळेच भारतीय संघाला १८१ धावांपर्यंत मजल मारता आली. दुबेने आपल्या खेळीत ७ चौकार आणि १ षटकार मारले. पण सामन्याच्या शेवटच्या षटकात चेंडू दुबेच्या हेल्मेटला लागला.

हर्षित राणाने घडवला इतिहास –

शिवम दुबेच्या हेल्मेटला चेंडू लागल्यानंतर त्याच्या जागी कनक्शन सबस्टिट्यूट म्हणून हर्षित राणाला खेळण्याची संधी मिळाली. यासह त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तो कनक्शन सबस्टिट्यूट म्हणून टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. यानंतर त्याने सामन्याला कलाटणी देणारी गोलंदाजी करताना तीन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या, जे भारतीय संघाच्या विजयासाठी मौल्यवान योगदान ठरले.

हर्षित राणाने पदार्पणातच घेतल्या तीन महत्त्वपूर्ण विकेट्स –

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये नुकत्याच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत खेळलेला हर्षित राणा १२व्या षटकात गोलंदाजी करायला आला आणि त्याने झटपट प्रभाव पाडला. त्याने लियाम लिव्हिंगस्टोनला नऊ धावांवर बाद केले. यानंतर त्याने जेकब बेथेल आणि जेमी ओव्हरटन यांच्या विकेट घेतल्या. त्याने सामन्यात चार षटकात ३३ धावा दिल्या आणि तीन विकेट्स घेतल्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Harshit rana became the first indian to make his t20i debut as a concussion substitute in ind vs eng vbm