IND vs ENG 4th T20I Updates in Marathi: भारत वि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या चौथ्या टी-२० सामन्यात अचानक भारताकडून हर्षित राणाने टी-२० मध्ये पदार्पण केले आहे. इतकंच नव्हे तर त्याने पदार्पणाच्या सामन्यातील पहिल्याच षटकात विकेट देखील मिळवली. टी-२० सामन्यात सामना सुरू झाल्यानंतर दोन तासांनी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये अचानक बदल झाला आणि आधी बाहेर बसलेल्या खेळाडूने संघात प्रवेश केला. यामागचं कारण ठरला शिवम दुबे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पहिल्या डावात अर्धशतक झळकावल्यानंतर फलंदाजी करताना शिवम दुबेच्या हेल्मेटला चेंडू लागला. दरम्यान त्याच्या जागी हर्षित राणाला प्लेईंग इलेव्हनमध्ये कनक्शन पर्याय म्हणून स्थान मिळाले. हर्षित नियमानुसार गोलंदाजी करू शकतो. दोन्ही डावांमधील ब्रेकनंतर शिवम दुबे पुन्हा मैदानावर उतरला नाही. त्याच्या जागी पर्यायी खेळाडू म्हणून रमणदीप सिंग मैदानावर उतरला. पण याबाबत पंच आणि सूर्यकुमार यादव यांच्यात चर्चा सुरू झाली. यानंतर हर्षित राणा मैदानात उतरला. ज्याने आधी रवी बिश्नोईच्या गोलंदाजीवर जोस बटलरला झेलबाद केलं. दुसऱ्याच चेंडूवर त्याने विकेट घेतली. लियाम लिव्हिंगस्टोनला झेलबाद करत पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

हर्षित राणाचं टी-२० मध्ये पदार्पण

कनक्शन पर्यायाबाबत नियमानुसार, जर एखाद्या खेळाडूला सामन्यादरम्यान डोक्याला दुखापत झाली, तर त्याच्या जागी इतर कोणत्याही खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट केले जाऊ शकते. मात्र, पर्यायी खेळाडू सारखाच असणं गरजेचं असतं. म्हणजे फलंदाजाच्या जागी गोलंदाजाचा समावेश करता येत नाही. वेगवान गोलंदाजाच्या जागी फिरकीपटूचा समावेश केला जाऊ शकत नाही. शिवम दुबे आणि हर्षित राणा वेगवान गोलंदाज अष्टपैलू खेळाडू आहेत. अशा स्थितीत भारताला गोलंदाजीत आणखी एक पर्याय मिळाला आणि भारताला त्याचा फायदा झाला.

पदार्पणाच्या सामन्यात ३ विकेट

हर्षित राणाने पदार्पणाच्या सामन्यातच ३ विकेट घेतले आहेत. राणाने ४ षटकांत ३३ धावा देत ३ महत्त्वाचे विकेट मिळवून दिले. हर्षित राणाने पहिल्याच षटकातील दुसऱ्याच चेंडूवर लियाम लिव्हिंगस्टोनला सॅमसनकरवी झेलबाद करत संघाला महत्त्वाची विकेट मिळवून दिली. यानंतर जेकब बेथलला सूर्यकुमार यादवकरवी झेलबाद केलं. यानंतर हर्षितला १९वे षटक टाकण्याची जबाबदारी मिळाली ज्यात त्याला २५ धावा रोखायच्या होत्या. पहिल्याच चेंडूवर चौकार गेला तर दुसऱ्या चेंडूवर २ धावा. पण अखेरीस हर्षित राणा अखेरच्या चेंडूवर मोठे फटके खेळणाऱ्या जेमी ओव्हरटनला क्लीन बोल्ड करत नववी विकेट मिळवून दिली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Harshit rana makes t20i debut as concussion substitute against england in pune ind vs eng 4th t20i bdg