IND vs ENG Harshit Rana react on concussion substitute : भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात, वेगवान गोलंदाज हर्षित राणालाही टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले, ज्यामध्ये त्याने आपल्या पदार्पणाच्या एकदिवसीय सामन्यात चमकदार कामगिरी केली आणि एकूण तीन विकेट घेतल्या. हर्षित राणासाठी गेले काही महिने चांगले गेले आहेत, ज्यात त्याला टीम इंडियासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे.
यातील सर्वात खास पदार्पण टी-२० मध्ये होते, ते म्हणजे कन्कशन सबस्टीट्यूट जे आजपर्यंत चर्चेत आहे. आता त्यावर हर्षितने प्रतिक्रिया दिली आहे. हर्षित राणाचे कन्कशन सबस्टीट्यूट चाहत्यांमध्ये आणि क्रिकेट तज्ञांमध्ये चर्चेचा विषय बनले आहे. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी खेळल्या गेलेल्या टी-२० मालिकेतील चौथ्या सामन्यात हर्षितचा संघात अचानक बदल म्हणून संघात समावेश करण्यात आला, ज्यामध्ये तो शिवम दुबेच्या जागी आला. अनेक माजी खेळाडूंनीही या बदलावर टीका केली होती, त्यावर आता हर्षित राणाचे वक्तव्य समोर आले आहे.
या सर्व गोष्टींकडे लक्ष देत नाही – हर्षित म्हणाला
हर्षित राणाने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, “लोक नेहमीच बोलत राहतील. मी अशा समस्यांकडे अजिबात लक्ष देत नाही. माझे काम मैदानावर चांगले खेळणे आहे. जेणेकरून मी संघाच्या विजयात योगदान देऊ शकेन. मला फक्त माझ्या देशासाठी चांगली कामगिरी करायची आहे आणि बाहेर काय चालले आहे याकडे मी लक्ष देत नाही.”
हर्षित राणाने त्याच्या एकदिवसीय पदार्पणाच्या सामन्यात मिळालेल्या अनुभवाबद्दल सांगितले की, “हा फॉरमॅट थोडा कठीण आहे. कारण १० षटके गोलंदाजी करताना तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या आव्हानांना सामोरे जावे लागते. परंतु, आपण सातत्यपूर्ण चांगल्या सरावाने ते अधिक चांगल्या प्रकारे हाताळू शकतो.”
पदार्पणाच्या सामन्यातच केला खास विक्रम –
भारतीय संघाकडून खेळणारा हर्षित राणा आता तिन्ही फॉरमॅटमध्ये पदार्पणाच्या सामन्यात तीन विकेट घेणारा टीम इंडियाचा पहिला गोलंदाज ठरला आहे. हर्षितने आत्तापर्यंत खेळलेल्या २ कसोटी सामन्यात ४ विकेट्स घेतल्या आहेत, तर एकदिवसीय आणि टी-२० सामन्यात प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या आहेत. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेनंतर, टीम इंडियाला चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्येही खेळायचे आहे ज्यामध्ये जसप्रीत बुमराहचा बॅकअप म्हणून हर्षितचा राखीव खेळाडूंच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.