ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० विश्वचषक २०२१च्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने रोमहर्षकरित्या पाकिस्तानचा पराभव केला. सामन्यात महत्त्वाच्या क्षणी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अलीने क्षेत्ररक्षणात चूक केली. त्याने ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मॅथ्यू वेडचा झेल सोडला, वेडनेच ऑस्ट्रेलियाला अंतिम सामन्यात पोहोचवले. सामन्यानंतर हसन अलीली चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. सोशल मीडियावरही हसन अलीला ट्रोल करण्यात आले.
हसनने हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वात कठीण क्षण असल्याचे म्हटले आहे. १७७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या संघाला शेवटच्या काही षटकांमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही. हसनने शाहीन आफ्रिदीच्या चेंडूवर वेडचा सोपा झेल सोडला. त्यानंतर वेडने शाहीनच्या सलग तीन चेंडूंवर तीन षटकार ठोकून पाकिस्तानला विश्वचषकातून बाहेर ढकलले. वेडच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले होते आणि तिथे ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा पराभव करून पहिल्यांदाच टी-२० विश्वचषक जिंकला.
हेही वाचा – मोठी बातमी..! नीरज चोप्राचा अजून एक ‘गोल्डन थ्रो’; क्रीडाविश्वातील ‘ऑस्कर’साठी मिळालं नामांकन!
हसन म्हणाला, ”माझ्या कारकिर्दीतील हा आतापर्यंतचा सर्वात कठीण क्षण होता आणि या गोष्टी लवकर विसरणे खूप कठीण आहे. व्यावसायिक खेळाडू असल्याने तुम्हाला पुढे जावे लागेल. खरे सांगायचे, तर हे मी आजपर्यंत कोणाला सांगितले नाही, पण त्या सामन्यानंतर मी दोन दिवस झोपलो नाही. माझी पत्नी माझ्यासोबत होती आणि मला झोप येत नसल्याने ती तणावात होती.”
”मी शांत होतो आणि एका बाजूला बसलो होतो, कारण मी सोडलेला झेल माझ्या मनात येत राहिला. बांगलादेशल दौऱ्यापूर्वी मी स्वत: ला तयार केले होते. बांगलादेशमध्ये मी तीन दिवसांत ५०० झेल घेतले आणि नो-बॉलच्या समस्येवरही काम केले”, असे हसनने सांगितले.