दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू हाशिम अमलाच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रम आहेत. आता काउंटी क्रिकेटमध्ये धीम्या गतीने फलंदाजी करत सामना वाचवल्याने त्याच्या फलंदाजीची चर्चा होत आहे. त्याने १०० चेंडूत केवळ ३ धावा केल्या. सरेकडून खेळताना त्याने २७८ चेंडूत ३७ धावांची खेळी केली. त्याच्या या धीम्या खेळीमुळे सरे हॅम्पशायरविरुद्धचा सामना ड्रा करण्यास यशस्वी ठरला. सामना वाचवण्यासाठी अमलाने पूर्ण दिवसभर मैदानात तग धरून ठेवला आणि प्रतिस्पर्धी गोलंदाजांना घाम फोडला.
हॅम्पशायरने पहिल्या डावात ४८८ धावा केल्या. या धावसंख्येत कॉलिन डी ग्रँडहोमची मोलाची भर पडली. त्याने २१३ चेंडूत १७ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने १७४ धावा केल्या. ही धावसंख्या गाठण्यासाठी सरेची टीम मैदानात उतरली खरी, मात्र ७२ धावांवर ऑलआउट झाली. हाशिम अमलाने पहिल्या डावात २९ धावा केल्या. फॉलोआनमुळे संघाला पुन्हा फलंदाजी करण्याची संधी मिळाली. मात्र यावेळी हाशिम अमलाने मैदानात तग धरून ठेवला. इतर फलंदाजांची त्याला साथ मिळणं कठीण होत होतं. एका पाठोपाठ एक गडी बाद होत होते. मात्र अमलाने धीर काही सोडला नाही. त्याने २७८ चेंडूत ३७ धावांची खेळी केली आणि सामना ड्रॉ केला. सरे संघानं दुसऱ्या डावात ८ गडी गमवून १२२ धावा केल्या. त्यात अमलाने पहिल्या १०० चेंडूत फक्त ३ धावा केल्या.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही हाशिम आमलाने धीमी खेळी केल्याचं उदाहरण आहे. २०१५ साली भारताविरुद्ध दिल्ली कसोटी खेळताना त्याने २४४ चेंडूत २५ धावा केल्या होत्या. त्यानंतर आता काउंटीमध्ये त्याने ही खेळी केली आहे. धीम्या खेळीच्या यादीत विस्फोटक फलंदाज एबी डिव्हिलिएर्सचाही समावेश आहे. त्याने २०१५ साली खेळलेल्या कसोटी सामन्यात २९७ चेंडूत ४३ धावा केल्या होत्या. तर २०१२ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी सामन्यात २२० चेंडूत ३३ धावा केल्या होत्या.