गतविजेत्या बार्सिलोना क्लबने लिओनेल मेस्सीच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर ला लीगा फुटबॉल स्पध्रेत शनिवारी ग्रेनेडा क्लबचा ४-० असा धुव्वा उडवला. नेयमारने बार्सिलोनासाठी चौथा गोल केला. या विजयानंतर बार्सिलोनाने गुणतालिकेत ४२ गुणांसह अव्वल स्थान कायम राखले आहे, तर अवघ्या एका गुणाने अॅटलेटिको माद्रिद पिछाडीवर आहे.
८ व्या मिनिटाला मेस्सीने गोल करून बार्सिलोनाचे खाते उघडले. त्यानंतर १४व्या आणि ५८व्या मिनिटाला गोल करत मेस्सीने हॅट्ट्रिकची नोंद केली. सामना संपायला ७ मिनिटे शिल्लक असताना नेयमारने गोल करून बार्सिलोनाचा ४-० असा विजय निश्चित केला.
लुईस सुआरेझ दोन सामन्यांसाठी निलंबित
बार्सिलोना क्लबचा आघाडीपटू लुईस सुआरेझ पुन्हा अडचणीत सापडला आहे. कोपा डेल रे फुटबॉल स्पध्रेतील लढतीत इस्पान्योल क्लबच्या खेळाडूचा अपमान केल्याप्रकरणी सुआरेझला कोपा डेल रे स्पध्रेतील दोन सामन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे. स्पॅनिश फुटबॉल महासंघाने हा निर्णय घेतला. कॅम्प नोउ येथे झालेल्या लढतीत बार्सिलोनाने ४-१ असा दणदणीत विजय मिळवला होता. या लढतीनंतर सुआरेझने इस्पान्योलच्या खेळाडूंचा अपमान केल्याचा अहवाल सामनाधिकारी जुआन मार्टिनेझ मुनुएरा यांनी सादर केला. या लढतीत इस्पान्योलच्या दोन खेळाडूंना लाल कार्ड दाखवण्यात आले होते.